राहुरी- महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उर्वरित प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठीचे उपोषण अखेर संपुष्टात आले. विद्यापीठाच्या वतीने आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण काल संध्याकाळी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते सोडण्यात आले.
प्रकल्पग्रस्तांसाठीच्या भरतीची जाहिरात दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी प्रसारित करण्यात आली होती; मात्र जाहिरात प्रसिद्ध होऊन आठ महिने उलटूनही विद्यापीठ प्रशासन भरती प्रक्रिया पूर्ण करत नव्हते. यामुळे संतापलेल्या विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांनी गेटसमोर उपोषणास सुरुवात केली होती. वर्ग चारमधील ज्या पदांसाठी परीक्षा आहे आणि वर्ग तीनमधील सर्व पदांच्या परीक्षेचे
वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांकडून होत होती.
दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कुलसचिव राजेंद्र पाटील, खासदार निलेश लंके व प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी यांच्यात सविस्तर चर्चा झाली. या चर्चेतून असा निर्णय घेण्यात आला की टीसीएसकडून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तातडीने पाठपुरावा करावा.
तसेच, भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असे ठरले. या ठोस आश्वासनांवर प्रकल्पग्रस्तांनी उपोषण मागे घेतले. यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया लवकर गती घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








