अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संगमनेरमधील नराधमाला सुनावण्यात आली १० वर्ष कारावासाची शिक्षा

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 22, 2025

संगमनेर- येथील ३२ वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलीवर पुणे आणि नालासोपारा येथे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी बुधवारी (दि. २०) दिलेल्या निकालानुसार आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास, सात हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास आणखी एक वर्षांची कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

गुन्ह्याची सुरुवात

बाळासाहेब जगन्नाथ रोकडे (वय ३२, रा. श्रीरामनगर, संगमनेर) असे दोषी ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. १३ मार्च २०१९ रोजी पीडित मुलगी घरून मैत्रिणीसोबत बँकेत जाण्याचे सांगून बाहेर पडली. मात्र ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला आणि अखेर १४ मार्च रोजी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली.

मुलीचा शोध व पोलिसांची मदत

१५ मार्च रोजी पीडितेने अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून कुटुंबीयांशी संपर्क साधला. ती नालासोपारा येथे असल्याचे सांगितले. आईने तिला तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. स्थानिक तरुणांच्या मदतीने ती पोलीस ठाण्यात पोहोचली आणि त्यानंतर पोलिसांनी तिला संगमनेरला आणले.

मादक द्रव्य देऊन बेशुद्ध केले

तपासात उघड झाले की, आरोपी रोकडे याने मुलीला गार्डनमध्ये नेऊन ज्यूसमधून मादक द्रव्य दिले. त्यानंतर ती बेशुद्ध पडली आणि रात्री उशिरा शुद्धीवर आल्यानंतर स्वतःला पुण्यातील एका लॉजवर असल्याचे तिला जाणवले. तेथे आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी तिला रेल्वेने नालासोपारा येथे नेण्यात आले आणि तेथेही अत्याचाराची पुनरावृत्ती झाली.

तपास व दोषारोपपत्र

या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अभिजित लांडे यांनी केला. संपूर्ण पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पुरावे व साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा