अहिल्यानगमध्ये संघर्ष प्रतिष्ठानची दहिहंडी मुंबईच्या सिद्धिविनायक गोविंदा पथकाने सात थर फोडली

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 18, 2025

अहिल्यानगर- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या संघर्ष प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडीला शहरासह जिल्हाभरातील तरुणांनी हजेरी लावली. यंदा तरुणांनी गर्दीचा उच्चांक मोडला. मुंबई येथील सिद्धिविनायक गोविंदा पथकाने सात थर रचून दहीहंडी फोडली. या दहीहंडी उत्सवाचा तरुणांसह नगरकरांनी मनमुराद आनंद घेतला.

आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सावेडी उपनगरातील संघर्ष प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यंदा मोठ्या उत्साहामध्ये संघर्ष चौकात दहीहंडीचा उत्सव पार पडला. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्यासह संघर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा दहीहंडी उत्सव गतवर्षीपेक्षा आगळावेगळा ठरला. उत्सवामध्ये तरुणाई विविध गाण्यांवर थिरकताना दिसली.

संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक संपतदादा बारस्कर म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक दिवसांपासून दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. आपली संस्कृती टिकली पाहिजे आणि आपली संस्कृती टिकविण्यासाठी आपणच प्रयत्न करणे गरजेचे आहे.

दहीहंडी उत्सवा मधून तरुणाई एकत्र येते तरुणाईचा एकोपा दिसतो हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. या आयोजनासाठी संघर्ष प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी मनापासून परिश्रम घेतात. येणाऱ्या काळात या उत्सवाला आणखी मोठे स्वरूप देण्यात येईल. दरम्यान, मुंबई येथील सिद्धिविनायक गोविंदा पथकाने सात थर रचून संघर्ष प्रतिष्ठानची दहीहंडी फोडली.

पौराणिक वारसा जपणे ही सर्वांची जबाबदारी

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, दहीहंडी उत्सवातून आपण आपला पौराणिक वारसा जपत आहोत. पौराणिक व ऐतिहासिक वारसा जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. हाच वारसा येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असतो. संघर्ष प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत आहे. आज हा सावेडी उपनगरातील एक प्रमुख उत्सव ठरला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा