पारनेर तालुक्यातील ५४ गावांचा डोंगरी विभाग कार्यक्रमांतर्गत समावेश, चहूबाजूंनी डोंगर असतांना समावेश न केल्याने काही गावांचा संताप

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 2, 2025

पारनेर- राज्य सरकारने जाहीर केलेल्या डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत पारनेर तालुक्यातील ५४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत समाविष्ट गावांतील नागरिकांना आता शैक्षणिक सवलती, नोकरीसाठी डोंगरी दाखले तसेच विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या नव्या सुधारित यादीनुसार उपसचिव नि. भा. खेडकर यांनी ही माहिती जाहीर केली असून, स्थानिक नागरिकांत समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील डोंगरी गावांची यादी

सुधारित यादीत भोंद्रे, ढोकी, सांगवी सूर्या, पिंपरी गवळी, वाळवणे बुद्रूक, पिंपरी पठार, धोत्रे बुद्रुक, पठारवाडी, टाकळी ढोकेश्वर, पानोली, नारायण गव्हाण, गोरेगाव, वडगाव दर्या, पाडळी दर्या, काकणेवाडी, सारोळा आडवाई, जलसेन, पुणेवाडी, वनकुटे, राळेगणसिद्धी, हत्तलखिंडी, तिखोल, बाभूळवाडे, डोंगरवाडी, चिंचोली, शेरी कोलदरा अशा ५४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत काही आदर्श ग्रामपंचायतींचाही समावेश झाल्यामुळे स्थानिक पातळीवरही हा निर्णय स्वागतार्ह ठरला आहे.

ग्रामस्थांना दिलासा

यादीत समाविष्ट गावांतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत शासन निर्णयाचे स्वागत केले आहे. डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या सुविधा, आर्थिक सवलती आणि शिक्षण-नोकरीच्या संधींमुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. विशेषतः डोंगराळ आणि जिरायती पट्ट्यातील गावांना या निर्णयामुळे नवसंजीवनी मिळणार आहे.

भोयरे गांगर्डा व कडूस वंचित, संतापाची लाट

मात्र दुसरीकडे, चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेली असूनही भोयरे गांगर्डा आणि कडूस या गावांचा समावेश या यादीत न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या गावांतील शेतकरी मुख्यतः जिरायती शेतीवर अवलंबून आहेत आणि अनेक वर्षांपासून विविध शासकीय योजनांपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे डोंगरी भाग म्हणून मान्यता मिळाल्यास त्यांना आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून मोठा फायदा झाला असता, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

राजकीय पाठपुरावा असूनही अपेक्षित न्याय नाही

भोयरे गांगर्डा आणि कडूस गावांच्या समावेशासाठी मागील तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी खासदार डॉ. नीलेश लंके यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, यावेळीही शासन निर्णयात या गावांचा समावेश न झाल्याने ग्रामस्थांच्या आशा पुन्हा धुळीस मिळाल्या आहेत. शासनाने या गावांचा पुन्हा एकदा आढावा घ्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

दरम्यान, हत्तलखिंडी आणि पिंपरी पठार या गावांचा डोंगरी यादीत समावेश झाल्याने स्थानिक नेतृत्वाने समाधान व्यक्त केले आहे. हत्तलखिंडीच्या सरपंच गजराबाई गायकवाड आणि पिंपरी पठारचे सरपंच अनिल शिंदे यांनी ही माहिती दिली असून, या निर्णयामुळे गावाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा