पाथर्डी नगरपरिषदेमध्ये १७ ऐवजी आता २० नगरसेववक, इच्छुकांची गर्दी वाढली; प्रारूप प्रभाग रचना जाहीर

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 19, 2025

पाथर्डी- नगरपरिषदेच्या २०२५-२६ या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना सोमवारी जाहीर झाली. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची २७, २११ लोकसंख्या लक्षात घेऊन १० प्रभाग निश्चित केले आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यामुळे एकूण २० नगरसेवक निवडले जातील.

नगराध्यक्षाची थेट निवड सर्व प्रभागातील मतदारांकडून होईल. यापूर्वी १७ नगरसेवक असलेल्या नगरपरिषदेत यावर्षी तीन नगरसेवकांच्या जागा वाढल्या आहेत. प्रभाग रचना जाहीर झाल्याने नागरिकांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

सोमवारी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक ७ मध्ये सर्वाधिक २,९७६ लोकसंख्या आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये सर्वात कमी २,४६३ लोकसंख्या आहे.

प्रभागनिहाय लोकसंख्येचा तपशील खालीलप्रमाणे : प्रभाग १ः२,५९१, प्रभाग २ २,७०९, प्रभाग ३ः २,५६८, प्रभाग ४ः २,६३२, प्रभाग ५ः २,९५९, प्रभाग ६ः २,७७९, प्रभाग ७ : २,९७६ (सर्वाधिक), प्रभाग ८ : २,५५९, प्रभाग ९ २,९७५, प्रभाग १० : २,४६३ (किमान) आहे.

प्रभाग रचनेचा नकाशा आणि तपशील नगरपरिषद कार्यालय तसेच वीर सावरकर मैदानातील सूचना फलकावर नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध आहे. इच्छुकांनी हरकती व सूचना १८ ते ३१ ऑगस्ट २०२५ (दुपारी ३ वाजेपर्यंत) नगरपरिषदेच्या आवक-जावक विभागात सादर कराव्यात. याबाबत सुनावणीकरिता नागरिकांना स्वतंत्रपणे कळविले जाईल.

.. अन इच्छुकांची गर्दी उसळली..

प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच नगरपरिषद कार्यालयात इच्छुक उमेदवार आणि नागरिकांची गर्दी उसळली. यामुळे निवडणुकीच्या बिगुलाला अनौपचारिक सुरुवात झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. दरम्यान, माजी नगरसेवक चांद मणियार यांनी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकत नोंदवली आहे. मुख्याधिकारी संतोष लांडगे व नगर रचना विभागाचे नरेंद्र तेलोरे यांनी प्रारूप प्रभाग रचना सोमवारी प्रसिद्ध केली.

नगरपरिषद निवडणुकीला वेग…

पाथर्डी शहराची लोकसंख्या: २७, २११ (२०११ जनगणना) आहे. प्रभाग : १० नगरसेवक : २० (यापूर्वी १७), नगराध्यक्ष : थेट जनतेतून निवड. हरकती व सूचना : ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत होतील. या प्रारूप रचनेमुळे नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना आणखी उधाण येण्याची शक्यता आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा