राहुरी- अल्पवयीन कॉलेज तरुणीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपी तरुणाला राहुरी पोलीस पथकाने मुसक्या आवळून जेरबंद केले. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीची राहुरी बाजारपेठेतून पायी धिंड काढत नागरिकांसमोर आणले.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहिती अशी, की या घटनेतील १७ वर्षीय कॉलेज तरुणीची पाच महिन्यांपूर्वी आरोपी यश अनिल डौले याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरू झाले आणि त्यांची जवळीक वाढली. दि. २८ जुलै २०२५ रोजी दुपारी आरोपी यश डौले याने तरुणीला शनिशिंगणापुर रोडवरील उंबरे गावच्या शिवारात असलेल्या हॉटेलच्या रूममध्ये नेले.
तेथे त्याने “मला तु खूप आवडते, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे” असे सांगून तरुणीला मिठीत घेऊन विनयभंग केला. त्याचबरोबर दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढले आणि जर कोणी काही सांगितले तर ते फोटो व्हायरल करीन, अशी धमकी दिली. दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी आरोपी यश डौले याने पुन्हा कॉलेज तरुणीला मोटारसायकलवर बसवून नगर-मनमाड राज्य महामार्गावरील नांदगाव शिंगवे शिवारातील लॉजमध्ये नेले. तेथे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला.
नंतर “तुझे फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर टाकून इज्जत घालवेन” अशी धमकीही दिली. कॉलेज तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी यश अनिल डौले (रा. जोगेश्वर आखाडा, ता. राहुरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी यश अनिल डौले याच्यासोबत त्याला लॉजमधील रूम उपलब्ध करून देणारा लॉज मालक अनिकेत विश्वास जाधव, रा. शिंगवे नाईक यांनाही अटक करून गजाआड केले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पो. नि. सुदाम शिरसाठ, हवालदार सतीश आवारे व पोलिस नाईक कुदळे हे करीत आहेत.








