राजूर- येथील राहुलनगर येथे एका ६० वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील सुमारे साडेचार लाख रुपयांच्या सोन्याच्या दोन चेन हिसकावून पळणारा चोरटा राजुर पोलिसांनी केवळ २४ तासांत गजाआड केला. पोलिसांनी चोरीस गेलेल्या दोन्ही चेनसह ४ लाख ३९ हजार ९२२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की फिर्यादी विष्णु रामभाऊ हेकरे (वय ६०) हे १० ऑगस्ट रोजी रात्री घरात झोपले असताना, रात्री २ वाजताच्या सुमारास एक अनोळखी इसम वेषांतर करून घरात शिरला. त्याने हेकरे यांचे तोंड बांधून त्यांना घराबाहेर नेऊन पुन्हा आत ढकलले व किचनजवळ नेऊन त्यांच्या गळ्यातील ४८ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन हिसकावून पळ काढला.
घटनेनंतर राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२४/२०२५ नुसार भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहितीदारांची मदत आणि जलद कारवाईद्वारे संशयिताचा शोध सुरू केला.
संशयित सागर दिगंबर पवार (वय ३१, रा. राजुर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे, पोलीस उपनिरीक्षक विलास माळोदे, पोलीस हवालदार अशोक गाढे, पोलीस हवालदार संभाजी सांगळे आणि नवनाथ नाडेकर यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास माळोदे करत आहेत.








