वंदे भारत, नगर-पुणे रेल्वेसाठी रेल्वेमंत्री सकारात्मक खासदार नीलेश लंके यांचे प्रतिपादन नागपूर-पुणे वंदे भारत गाडीचे नगरमध्ये जल्लोषात स्वागत

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 11, 2025

अहिल्यानगर : नागपूर ते पुणे या वंदे भारत रेल्वे गाडीस अहिल्यानगर येथे थांबा असावा यासाठी आपण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला, त्यास त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्याचे सांगतानाच पुणे ते नगर व नगर ते छत्रपती संभाजीनगर या नव्या रेल्वेमार्गासाठीही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या मार्गाचा डीपीआर देखील मंजुर झाला आहे. राजकीय आयुष्यात असा कार्यक्षम मंत्री आपण पाहिला नसल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.

नागपूर ते पुणे या वंदे भारत रेल्वे गाडीचे अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खा.नीलेश लंके यांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी बोलताना खा. लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. याप्रसंगी रेल्वेचे अधिकारी पद्सिंह जाधव, विकास कुमार, शंतणू आत्रे, स्टेशन मॅनेजर सुधीर महाजन, शुभम थोरात, बेनीप्रसाद मीना, अभय आगरकर, अभिषेक कळमकर, योगीराज गाडे यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, नगरकरांसाठी आजचा दिवस हा अविस्मरणीय क्षण आहे. नागपूर ते पुणे या ८८१ किलोमीटरच्या प्रवासात ही गाडी १२ ठिकाणी थांबणार असून त्यात अहिल्यानगर स्थानकाचा समावेश आहे. रेल्वे मंत्र्यांनी या मागणीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. माझ्या राजकीय आयुष्यात असे कार्यक्षम मंत्री मी कधीही पाहिले नाहीत. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आपण रेल्वेमंत्र्यांकडून संभाजीनगर ते अहिल्यानगर व अहिल्यानगर ते पुणे अशी औद्योगिकरण, धार्मिक स्थळांचा विचार करून रेल्वेमार्ग सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीलाही रेल्वेमंत्रयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज या मार्गाचा डीपीआर देखील मंजूर झाल्याचे खा. लंके म्हणाले.

खा लंके पुढे म्हणाले, काल परवा मी रेल्वेमंत्र्यांकडे आष्टी ते चोंडी व चोंडी ते दौंड अशा मार्गाची मागणी केली आहे. पुणे ते नगरदरम्यान इंटरसिटी रेल्वेचीही आपण मागणी केली आहे. इंटरसिटी सुरू झाल्यानंतर नगरला वेगळे महत्व प्राप्त होणार आहे. पुण्यात काम करणारा नगरचा माणूस दररोज या गाडीने प्रवास करून वेळेत पोहचू शकतो असेही त्यांनी सांगितले.

राम शिंदे हे विधानपरिषदेचे सभापती झाल्यानंतर प्रथमच आम्ही एका व्यासपीठावर एकत्र आलो. विधानपरिषदेचे सभापती म्हटल्यावर आपला भेटीसाठी कधी नंबर लागणार असा प्रश्न होता. परंतू योगायोगाने भेट झाली ती देखील स्टेशनवर झाल्याचे सांगत खा. लंके यांनी यावेळी मिश्किली केली.

लंके समर्थकांकडून कार्यक्रम हायजॅक

वंदे भारत गाडीच्या स्वागतासाठी सत्ताधारी भाजपा व घटकपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही आमंत्रीत करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमासाठी खा. लंके समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते. या रेल्वेच्या श्रेयावरून मा. खा. डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर लंके समर्थकांनी नगर का सांसद कैसा हो, नीलेश लंके जैसा हो अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्यास भाजपा कार्यकर्त्यांकडून मोदी-मोदी असे उत्तर देण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यावर लंके-लंके, नेते-नेते असे प्रत्युत्तर देत लंके समर्थकांनी भाजपा समर्थकांचा आवाज क्षीण करत हा संपूर्ण कार्यक्रमच हायजॅक केला.

नागपूर ते पुणे या वंदे भारत रेल्वेगाडीचे प्रा. राम शिंदे, खा. नीलेश लंके यांनी अहिल्यानगर स्थानकावर स्वागत केले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा