अहिल्यानगर जिल्ह्यात उशिरा आल्याने पावसाने पिकांना दिली नवसंजीवनी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 15, 2025

चितळी- गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी सायंकाळी पुनरागमन करत शेतकरी वर्गाची चिंता काहीशी दूर केली असली तरी उशिरा झालेल्या पावसामुळे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचे जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जवळपास पंधरा ते वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर वरुणराजाने काल हजेरी लावली. कोमेजून गेलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असली तरी अनेक पिकांना फुलधारणेच्या अवस्थेत पाणीटंचाई भासल्याने उत्पादन क्षमतेत घट येण्याची चिन्हे आहेत. चातकाप्रमाणे शेतकरी वर्ग रोज आभाळाकडे डोळे लावून बसलेला असताना पावसाचे फक्त घुमजाव होत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग दाटून आले होते.

गेल्या काही दिवसांत झालेला पाऊस अल्प प्रमाणात असल्याने पाण्याच्या पातळीत विशेष वाढ झालेली नव्हती. परिणामी पिकांना पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यात शेतीसाठी लागणाऱ्या विजेच्या लपंडावाने परिस्थिती अधिकच बिकट केली होती.

महावितरणकडून कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा हा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होता; मात्र गुरुवारी झालेल्या पावसाने पिकांना बूस्टर डोस मिळाला आहे. तरीसुद्धा ओढे नाले खळखळून वाहण्यासाठी आणि पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होण्यासाठी अजूनही मोठ्या पावसाची गरज असल्याचे शेतकरी वर्गाचे मत आहे.

आधीच हुमणीसह विविध रोगांनी सोयाबीन पिकांवर आक्रमण करून शेतकऱ्यांना हैराण केले होते. यामध्ये पंधरा ते वीस दिवस पावसाने ओढ दिल्याने ऐन फुलधारणेच्या अवस्थेत पाणी न मिळाल्यामुळे काही प्रमाणात फुलगळ झाली आहे. त्यामुळे यंदा सोयाबीन उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकरी यामुळे अधिकच चिंतेत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा