माजी सैनिकाला फसविणाऱ्या मच्छिंद्र नवलेस दोन महिने कारावास संगमनेर न्यायालयाचा निर्णय

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: June 20, 2025

संगमनेर : माजी हवाई दल अधिकारी रमेश रंगनाथ सातपुते रा. संगमनेर यांची ३५ लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेरच्या न्यायालयाने मच्छिंद्र सदाशिव नवले यास दोन महिन्यांचा साधा तुरूंगवास व ३७ लाख रूपये देण्याचा आदेश दिला.

यासंदर्भातील हकीगत अशी की, फिर्यादी रमेश रंगनाथ सातपुते हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी असून सध्या ते संगमनेर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे नातेवाईक आरोपी मच्छिंद्र सदाशिव नवले याने गाळा व शेती घेण्यासाठी सातपुते यांच्याकडून सुरूवातीस १६ लाख व त्यानंतर १९ लाख असे उसनवार पैसे घेतले होते. सन २०२१ मध्ये घेतलेले हे पैसे २८ फेब्रुवारी २०२२ रोजी परत करण्याचा शब्द मच्छिंद्र नवले याने दिला होता.

हा व्यवहार उसनवारीचा व बिनव्याजी असल्याने दि. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नोटरी करारनामा करण्यात येऊन आरोपी नवले याने रमेश सातपुते यांना युनियन बँक ऑफ इंडिया शाखा घुलेवाडीचे पाच धनादेश दिले होते. दि.२८ मार्च २०२२ रोजी नवले हा ३५ लाख रूपये परत करून धनादेश परत घेणार होते. मात्र आरोपी नवले याने दि. २८ मार्च रोजी सातपुते यांना रोख रक्कम न देता ३५ लाख रूपयांचा धनादेश दिला. सातपुते यांनी हा धनादेश बँकेत सादर केला असता पेमेंट स्टॉप या शेऱ्यासह तो न वटता परत आला.

धनादेश न वटल्याने आरोपी नवले याच्या विरोधात रमेश सातपुते यांनी कलम १३८ नुसार प्रोसेस जारी केली. त्यावर संगमनेर न्यायालयात सुनावणी होऊन दोन्ही बाजूंनी युक्तीवाद करण्यात आले. फिर्यादी सातपुते यांच्या वतीने ए.डी.घुले राहुल कडलक संदीप नलावडे तर आरोपीच्या वतीने पी.जी.वाणी यांनी युक्तीवाद केला.

दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपी मच्छिंद्र सदाशिव नवले यास परक्राम्य संलेख अधिनियम १८८१ चे कलम १३८ अन्वये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २५५/२ अन्वये दोन महिन्यांची साध्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. आरोपीने फिर्यादी सातपुते यांना धनादेशाची रक्कम रूपये ३५ लाख व आरोपीस अधिकची नुकसानभरपाई म्हणून २ लाख असे एकूण ३७ लाख रूपये एक महिन्याच्या आत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम ३५७ अन्वये देण्यात यावी. ही रक्कम न दिल्यास आरोपीस एक महिना साध्या कारावासाची शिक्षा भोगावी असा आदेश दिला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा