कर्जत-जामखेडमध्ये शिंदे विरुद्ध पवार संघर्ष पेटला, राम शिंदे रडले की त्यांना पद मिळतं; आ.रोहित पवारांची टीका

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 21, 2025

कर्जत- सांगली येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यातील संवादाने पुन्हा एकदा काका-पुतण्याच्या नात्याचा राजकीय पैलू पुढे आणला. रोहित पवार यांनी “राजकारणात गावकीकडे पाहता, पण भावकीकडेही लक्ष द्या” अशी साद घातल्यानंतर अजित पवारांनी मिश्कील उत्तर देत “भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच किमान आमदार झालात” असा टोला लगावला. या वाक्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.

शिळ्या कढीला उत

या घडामोडींवर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी ‘पवार कुटुंब वारंवार शिळी कढी उकळून राजकीय टॉर्चर करतात’ असा आरोप केला. त्यांनी स्पष्ट केले की, अजित पवार मुद्दाम असे वक्तव्य करून स्वतःची राजकीय भूमिका मजबूत करण्याचा प्रयत्न करतात. शिंदेंनी सूचक इशारा दिला की या प्रकरणात ते पुन्हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

रोहित पवारांचा पलटवार

राम शिंदेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना रोहित पवारांनी चांगलाच पलटवार केला. “२०१९ मध्ये मी त्यांचा पराभव केला, तेव्हा ते रडले आणि विधान परिषद मिळाली. २०२४ मध्ये पराभव झाला, पुन्हा रडले आणि सभापतीपद मिळालं. आता पुन्हा रडत आहेत, कदाचित मुख्यमंत्री दिल्लीला जातील आणि आपली खुर्ची मिळेल या अपेक्षेने प्लॅन आखत असावेत,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

निवडणूक संघर्षाची पार्श्वभूमी

कर्जत-जामखेड मतदारसंघातील शिंदे विरुद्ध पवार संघर्ष जुना आहे. २०१९ च्या निवडणुकीत रोहित पवारांनी तब्बल ४३ हजार मतांनी राम शिंदेंचा पराभव केला होता. मात्र २०२४ च्या निवडणुकीत अवघ्या १,२४३ मतांनी रोहित पवारांना विजय मिळाला. या चुरशीच्या लढतीमुळे राज्यभरात कर्जत-जामखेडच्या मतमोजणीवर साऱ्यांचे लक्ष लागले होते. पराभवानंतर शिंदेंनी न्यायालयाचे दारही ठोठावले.

अजित पवारांची मिश्कील शैली

कराड येथील एका सभेत अजित पवारांनी देखील रोहित पवारांना उद्देशून “माझी सभा झाली असती तर निकाल वेगळा लागला असता” असा डिवचणारा उल्लेख केला होता. या वक्तव्यामुळे पवार कुटुंबातील आतल्या गोटातील राजकारण अधिक चर्चेत आलं.

संघर्षाची पुढील दिशा

राम शिंदेंना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ असून, त्यातूनच त्यांना विधान परिषदेचे सभापतीपद मिळाले. आता सांगलीतील या वादानंतर पुन्हा एकदा शिंदे आणि पवार यांच्यातील राजकीय शब्दयुद्ध पेटले आहे. सोशल मीडियावर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार धुरळा उडतोय.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा