आपल्या लेकराबाळांच्या भल्यासाठी एकजूट दाखवा, मनोज जरांगे पाटील यांचे अहिल्यानगरमधील मराठा बांधवाना आवाहन

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 28, 2025

शेवगाव- मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले. आपल्या लेकराबाळांच्या कल्याणसाठी एकजूट दाखवा, आता नाही तर परत कधीच नाही, असे आवाहन संघर्ष योध्द्धा मनोज जरांगे पाटील यांनी शेवगाव येथे केले.

मराठा आरक्षणासाठी संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आज अभूतपूर्व मराठा बांधवांसमवेत मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. सकाळी निघालेला मोर्चा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात रात्री नऊ वाजता पोहोचला. तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे घोटण येथे जेसीबीने हार घालून स्वागत करण्यात आले. तर, शेवगाव शहराजवळ नित्यसेवा हॉस्पिटलजवळ फुलांची उधळण करण्यात आली.

शेवगाव येथील क्रांती चौकात मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी चौकात अफूतपूर्व गर्दी जमली होती. यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण मोर्चाला पाठिंबा दिला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता आरपारची लढाई आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईवरून परतणार नाही. ज्या बांधवांना शक्य आहेत. त्यांनी आमच्या सोबत चलावे. ज्यांना शक्य नाही त्यांनी कुटुंबाची धुरा सांभाळावी. शेवगावच्या अभूतपूर्व प्रतिसादाने आपण अर्धी लढाई जिंकली आहे. दरम्यान, सकाळपासून हजारो वाहने रस्त्याने मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत.

त्यात पिकअप, टेम्पो, मोटारकार यांचा समावेश आहे. तर, काही उत्साही मराठा सेवक मोटारसायकलवर मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अहिल्यानगरमध्ये शेंडी बाह्यवळण चौक, दूध डेअरी चौक, सनफार्मा
चौक, निंबळक चौक, नेप्ती चौक येथे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी स्टेज उभारण्यात आले होते. तर, सकाळपासून मराठा तरुण मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उभे होते.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरद्दीवर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पोलीस पथकासह स्वतः हजर होते. तर, सकाळपासून जागोजागी उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांना फिक्स पाॅईंट देऊन बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा