श्रीरामपूर : सासूने उसने पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात घरफोडी करणारा आरोपी येथील पोलिसांनी ४८ तासाच्या आत पकडला आहे. येथील शहर काल मंगळवारी (दि. १७) पोलिसांनी आरोपीकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार ते गुरुवारच्या दरम्यान शहरातील वार्ड नंबर २, जुने घरकुल, रेल्वे लाईन परिसरात राहणाऱ्या रुकय्या जब्बार शेख त्यांच्या राहत्या घराला व्यवस्थित कुलुप लावुन लोणी येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या.
त्यावेळी त्यांच्याकडे असलेले सर्व सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्यांनी राहत्या घराच्या कपाटात ठेवलेली होती. तेव्हा रुकय्या जब्बार शेख या घरी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरच्याने त्यांच्या राहत्या घराची कडी सांध्यातून विचकटवून सुमारे २ लाख ४ हजाराचे सोन्याचे दागिने रोख रकमेसह चोरुन नेले होते.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रुकय्या शेख यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक रोशन विजय निकम, पोलीस हवालदार शफीक शेख, पोलीस नाईक भैरव अडागळे, पोलीस शिपाई धनंजय वाघमारे, अकबर पठाण, रविंद्र शिंदे, बाळासाहेब गिरी यांच्या पथकाने तपास करुन सदर गुन्ह्यातील चोरी फिर्यादीचा जावई साद शौकत शेख याने केल्याचे निष्पन्न केले.
त्यावरुन आरोपी साद शौकत शेख यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता, सासू रुकय्या शेख हिने उसने पैसे दिले नाही, म्हणुन त्याचा राग येऊन गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात चोरी केलेला माल १ लाख ९४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आरोपीकडून जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस हवालदार शफीक शेख, पोलीस नाईक भैरव अडागळे, धनंजय वाघमारे, अकबर पठाण, रविंद्र शिंदे, बाळासाहेब गिरी यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन विजय निकम करीत आहे.








