सुट्टीच्या दिवशीही मुद्रांक व नोंदणी कार्यालये सुरू राहणार

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: March 18, 2026

​अहिल्यानगर, दि. १८ – आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तसेच दस्त नोंदणीची वाढती मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व मुद्रांक व नोंदणी कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. या सुविधेचा लाभ घेऊन नागरिकांनी दस्त नोंदणीची कामे वेळेत पूर्ण करावीत, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी महेंद्र महाबरे यांनी केले आहे.

​१ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध होत असलेल्या बाजारमूल्य (रेडी रेकनर) दर तक्त्यामध्ये स्थावर मिळकतीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक नागरिक नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी दस्त नोंदणी पूर्ण करण्यास प्राधान्य देतात. परिणामी मार्च महिन्यात नोंदणी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होत असते.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच अधिकाधिक नोंदणी पूर्ण होण्यासाठी दि. २६ मार्च २०२६, दि. २८ मार्च २०२६ आणि दि. २९ मार्च ते ३१ मार्च २०२६ या शासकीय सुट्टीच्या दिवसांमध्ये सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व सह दुय्यम निबंधक कार्यालये नियमित कामकाजाच्या दिवशीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा