राहाता तालुक्याची सुकन्या शरण्या मुरादे हीची आंतरराष्ट्रीय युथ एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गंत बेल्जियम या देशात प्रतिनिधी म्हणून निवड

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 14, 2025

राहाता- खडकेवाके गावची सुकन्या शरण्या मनोज मुरादे हिची आंतरराष्ट्रीय युथ एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत युरोप खंडातील बेल्जियम या देशात प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. तिचे पुढील शिक्षण आणि कार्य बेल्जियममधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सेंट लुईस दे नमुर’ येथे होणार असल्याची माहिती खडकेवाके गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सचिन मुरादे यांनी प्रसार माध्यमांना दिली.

राहाता तालुक्यातील आदर्श गाव खडकेवाके येथील शरण्याची ही निवड अत्यंत मानाची ठरली आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय युथ एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांची भारतीय संस्कृती व भाषा यांची देवाण-घेवाण आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यासाठी भारतीय सांस्कृतिक राजदूत म्हणून निवड केली जाते.

या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी जगभरातील विविध देशांना भेट देतात आणि पुढील
शिक्षण परदेशात घेतात. सन या २०२५-२६ वर्षासाठी शरण्याची बेल्जियममध्ये निवड झाली आहे.
शरण्या ही सुरुवातीपासूनच अभ्यासू, मेहनती, जिद्दी आणि चिकाटीने प्रयत्न करणारी विद्यार्थिनी आहे. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण तिने मराठी माध्यमातून घेतले असून इयत्ता दहावीत तिने ९० टक्के गुण मिळवले आहेत.

या यशाबद्दल सचिन मुरादे यांनी समाधान व्यक्त केले. या निवडीमुळे खडकेवाके गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या निवडीनंतर नाशिक अशोका युनिव्हर्सल स्कूलचे प्राचार्य प्रमोद त्रिपाठी, प्रोग्राम डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नाना शेवाळे, ममता जयस्वाल, सीए रेखा पटवर्धन तसेच सरपंच संगीताताई मुरादे, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी शरण्याचे अभिनंदन करून तिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा