राहुरी तालुक्यातील पूर्व भागात संततधारेचा फटका

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: September 1, 2025

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने मानवी जीवनाबरोबरच पशुधनाचेही जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सूर्यदर्शन होणेही कठीण झाले होते. शनिवारी सकाळी मात्र पावसाने उघडीप दिल्याने सूर्यप्रकाश दिसला व टप्पे झालेले काम करण्यास वेळ मिळाला, मध्यंतरी झाकलेल्या आभाळातून अधूनमधून पडणाऱ्या सरीमुळे सदर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दुसरीकडे खरिपातील कपाशी, सोयाबीन, ऊस, भाजीपाला व चारा पिकांना हा पाऊस फायदेशीर ठरला आहे.

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील वळण, मानोरी, आरडगाव, पिंपरी वळण, चंडकापूर, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, पाथरे, मांजरी, तिळापुर, वांजुळपोई, माहेगाव, खुडसरगाव, मुसळवाडी या भागात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे, पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सूर्यदर्शन मुश्किल झाले असून दैनंदिन कामे खोळंबली आहेत.

विशेषतः दुग्ध व्यवसायाला फटका बसला आहे. पावसामुळे गवत-घास मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. गारठ्यामुळे जनावरांचे पाणी पिण्याचे प्रमाण घटले असून दूध उत्पादन कमी झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पडलेल्या सततच्या पावसाचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच पशुधनावरही झाला आहे. हा पाऊस १५ दिवसांपूर्वी झाला असता तर कपाशी, सोयाबीन, ऊस या पिकांना जास्त लाभ झाला असता.

कपाशी व सोयाबीन पिके हिरवीगार दिसत असली तरी वाढ अपेक्षेइतकी झालेली नाही. फुटवे कमी फुटल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. या परिसरात अजून मोठा पाऊस होणे अपेक्षित आहे. जमिनीची पाणीपातळी फारशी वाढलेली नाही. संततधार असली तरी पाणी खोलवर झिरपलेले नाही. त्यामुळे मोठ्या पावसाची अपेक्षा कायम आहे.

तरीसुद्धा इतर जिल्ह्यांतील अतिवृष्टी व दुरवस्थेच्या तुलनेत राहुरी तालुक्यातील पिके सुस्थितीत व तजेलदार असल्याचे दिसून येते. सोयाबीन शेंगांना दाणे परिपक्व होण्याच्या स्थितीत आल्याने पावसाचा त्याला फायदा झाला आहे. मात्र कपाशी पिकाला महिनाभर अगोदर चांगल्या पावसाची गरज होती. उशिरा झालेल्या पावसामुळे पिके हिरवीगार दिसत असली तरी वाढ अपेक्षित प्रमाणात झालेली नाही.

फुटवे कमी फुटल्याने व वाढ मर्यादित राहिल्याने कैरीची लागण कमी झाली आहे. याचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर होणार असून शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. तरीसुद्धा इतर जिल्ह्यांतील परिस्थितीच्या तुलनेत राहुरी तालुक्यातील खरिपाची पिके व्यवस्थित असल्याचे मान्य करावे लागेल .

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा