जगातील ‘या’ 7 देशात एकही नदी वाहत नाही, पण तरीही पाणी मुबलक; मग इथे पाणी येतं तरी कुठून?

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: July 7, 2025

पाणी हेच जीवन, असं आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. पाण्याशिवाय माणूस जीवंत राहू शकत नाही, जेच जीवनाचं सत्य आहे. मात्र, जगात असे काही देश आहेत जिथे एकही नदी वाहत नाही, आणि तरीही या देशांनी पिण्याच्या पाण्याची कोणतीही कमतरता भासू दिली नाही. वाचायला हे जरा विचित्र वाटू शकतं, पण हे वास्तव आहे. पृथ्वीच्या पाठीवर काही देश अशा भौगोलिक परिस्थितीत वसलेले आहेत जिथे नद्या निर्माण होण्यासाठी अनुकूलतेचाच अभाव आहे, पण त्यांनी पाण्याच्या समस्येवर आपल्याच पद्धतीने तोडगा काढला आहे.

सौदी अरेबिया

या यादीत पहिलं नाव घेतलं जातं ते सौदी अरेबियाचं. वाळवंटी प्रदेश, प्रखर उन्हाळा आणि वार्षिक पावसाचे अत्यल्प प्रमाण या सगळ्यांमुळे येथे एकही कायमस्वरूपी नदी नाही. पण सौदी अरेबिया आपली जलगरज भागवण्यासाठी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या ‘डिसॅलिनेशन प्लांट्स’चा मोठ्या प्रमाणात वापर करतो. हे तंत्रज्ञान अत्यंत खर्चिक असलं तरी या देशाने याद्वारेच पाण्याची टंचाई दूर केली आहे.

मालदीव

याच मार्गावर पुढे चालतं मालदीव. हे बेटराष्ट्र समुद्रात वसलेलं असलं तरी त्याच्या भौगोलिक रचनेमुळे येथे नद्यांची निर्मिती होत नाही. सच्छिद्र माती पावसाचं पाणी सहज जमिनीत शोषून घेते आणि ती पाण्याची पातळी भूगर्भात साठवते. हेच पाणी नंतर विहिरीद्वारे मिळवलं जातं. मालदीवमध्ये हेच नैसर्गिक जलस्रोत अनेक शतकांपासून पिण्याचं पाणी पुरवत आले आहेत.

माल्टा

माल्टा हा युरोपमधील छोटा बेटराष्ट्र. चुनखडीच्या जमिनीमुळे आणि उष्ण हवामानामुळे येथेही नद्या निर्माण होत नाहीत. मात्र हिवाळ्यात होणाऱ्या पावसामुळे काही छोटे प्रवाह आणि झरे निर्माण होतात. याच पाण्याचा साठा करून त्याचा वापर केला जातो. पावसाचे पाणी साठवण्यावर भर देऊन त्यांनी आपली गरज भागवली आहे.

बहरीन, कतार आणि कुवेत

बहरीन, कतार आणि कुवेत हेही अशाच रेषेवर येणारे देश. या खाडीच्या राष्ट्रांमध्ये पाण्याची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया केली जाते. याशिवाय, पावसाचं पाणी साठवण, विहिरींचं संवर्धन आणि जलपुनर्वापराची प्रगत पद्धती वापरली जाते. या देशांमध्ये पाण्याची किंमत उच्च असली तरी पिण्याच्या पाण्याचा तुटवडा फारसा जाणवत नाही, याचं श्रेय त्यांच्या नियोजनबद्ध धोरणांना जातं.

व्हॅटिकन सिटी

अखेरचं नाव म्हणजे व्हॅटिकन सिटी. जगातील सर्वात लहान देश, ज्याचा विस्तार इतका कमी आहे की त्यात एखादी नदी वळवण्याइतकीही जागा नाही. पण इतक्या लहान जागेतही त्यांनी शहर व्यवस्थापन, जलपुरवठा आणि स्वच्छतेच्या बाबतीत उत्तम पातळी राखलेली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा