पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात ५०० सदनिकांची घरकुल योजना राबवणार

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: June 25, 2025

अहिल्यानगर – नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरकुल मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महानगरपालिकेमार्फत शहरात ५०० सदनिकांचा घरकूल प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

या घरकुल योजनेसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. तसेच, वैयक्तिक जागेवर घरकुल बांधण्यासाठी २०० अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील ५५ घरकुलांचा प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

काटवन खंडोबा परिसरात महानगरपालिकेच्या जागेत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एका सदनिकेची किंमत सुमारे १५ लाख रुपये इतकी असून, ३०० चौरस फुटांची सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, संकुलाच्या आवारात कम्युनिटी हॉलसह इतर सुविधाही दिल्या जाणार आहेत.

या घरकुलांसाठी महानगरपालिकेकडे ७६० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याची छाननी सुरू आहे. घरकुलाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, तो शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर किमान १ लाख रुपये भरून नोंदणी करून घेतली जाणार आहे. या माध्यमातून नागरिकांना परवडणाऱ्या दरात स्वतःचे हक्काचे घर मिळणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

तसेच, वैयक्तिक जागेवर घरकुल बांधण्यासाठीही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुमारे अडीच लाख रुपयांचे अनुदान तीन टप्प्यात दिले जाते. त्यासाठी २०० अर्ज दाखल झाले आहेत. ५५ घरकुलांचा प्रकल्प अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील अनुदान लाभार्थ्याला मिळणार आहे.

घरकुल योजनेबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध कंपन्या, शाळा, मोठ्या व्यावसायिक आस्थापना अशा विविध ठिकाणी माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेतल्या जात आहेत. अधिकाधिक नागरिकांपर्यंत या योजनेची माहिती पोहचवण्याचे प्रयत्न आहेत. इच्छुकांनी अर्ज करण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागात संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा