कर्जत- नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा रोहिणी घुले, आरोग्य समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष संतोष म्हेत्रे, बांधकाम समितीच्या सभापतीपदी भास्कर भैलुमे, पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी सतीश पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मोहीनी पिसाळ तर उपसभापतीपदी सुवर्णा सुपेकर तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक म्हणून लंकाबाई खरात यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
कर्जत नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी गुरु बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत नगरपंचायतीच्या सभागृहात नगरसेवक व नगरसेविका यांची बैठक झाली. शुक्रवारी होणार असलेल्या निवडीबाबत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नावे सुचवली त्यानुसार सर्व निवडी बिनविरोध पार पडल्या.
सर्व सभापती निवडीसाठी प्रत्येकी एक एकच अर्ज आला, यामुळे सर्व निवडी बिनविरोध पार पडल्या यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय जायभाये उपस्थित होते.
या बैठकीला नगराध्यक्षा रोहिणी घुले, उपनगराध्यक्ष संतोष म्हेत्रे, नगरसेवक सतीश पाटील, भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, नगरसेविका ताराबाई कुलथे, छायाताई शेलार, सुवर्णा सुपेकर, लंकाबाई खरात, अश्विनी गायकवाड, ज्योती शेळके, मोनाली तोटे, मोहीनी पिसाळ हे उपस्थित होते.
युवा नेते सचिन घुले, विनोद दळवी, लालासाहेब शेळके, रवींद्र सुपेकर, देविदास खरात आदी उपस्थित होते. कर्जत नगरपंचायतीत आता सत्तांतर झाले आहे, याची जाणीव आम्हा सर्वांना आहे. विधान परिषदेचे सभापती आमचे नेते राम शिंदे यांनी आमच्यावर कर्जतची जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे आगामी काळात कर्जतकरांना नियमित व सुरळीत पाणी पुरवठा करणे, स्वच्छता राखणे, तात्काळ सेवा देणे आदींना प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही नुतन पदाधिकाऱ्यांनी दिली.
नव्या इमारतीत कामकाज सुरू
पाच कोटी रुपये खर्च करून कर्जत नगरपंचायतीची नवीन अद्ययावत प्रशस्त इमारत कर्जत राशीन रोडलगत पुर्ण झाली आहे. भाडोत्री जागेतुन कर्जत नगरपंचायतीचे कामकाज नव्या इमारतीत उत्साहात सुरु झाले आहे, कर्जत नगरपंचायतीला आज नुतन पदाधिकारी मिळाले आहेत. सत्ताबदल झाला आहे, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कर्मचारी व अधिकारी मोठ्या उत्साहाने कामाला लागले आहेत.
-संतोष म्हेत्रे उपनगराध्यक्ष, आरोग्य समिती सभापती, कर्जत नगरपंचायत)








