ahilyanagar: रात्री शेतात उजेड दिसला, शेतकरी जवळ गेला अन् गुप्तधनाच्या पूजेचा प्रकार उघड!

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: October 29, 2026

भंडारदरा परिसरातील शेंडी येथे एका शेतात गुप्तधन शोधण्याच्या उद्देशाने रात्री पूजा आणि मंत्रतंत्र केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतात उजेड दिसल्याने पाहणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला काही व्यक्ती कापूर आणि अगरबत्ती पेटवून पूजा करताना आढळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ग्रामस्थांच्या मदतीने सात जणांना शोधून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आणखी दोन आरोपी पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दुपारी औषधाची विचारणा, एकाकडून पोलीस असल्याची बतावणी

शेंडी येथील एकनाथ दगडू भांगरे (वय ५७) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास ते शेतात मोटारीला पाणी भरत होते. त्यावेळी ज्ञानेश्वर नामदेव लेंडे आणि त्याच्यासोबत अन्य तीन व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी ‘चित्रकुटाचे औषध’ मिळेल का, अशी विचारणा केली.

या परिसरात असे औषध उपलब्ध नसल्याचे सांगून भांगरे यांनी त्या व्यक्तींना आपण कुठून आला आहात, असे विचारले. त्यावेळी त्यांच्यातील एकाने आपण पोलीस असल्याचे सांगितल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

रात्री शेतात उजेड दिसल्याने उघड झाला प्रकार

त्याच दिवशी रात्री दहाच्या सुमारास भांगरे पुन्हा शेतात गेले. त्यांना शेतात उजेड दिसल्याने त्यांनी सुदाम मारुती इदे आणि सुरेश भाऊराव भांगरे यांना बोलावले. तिघे जवळ गेले असता आठ ते नऊ व्यक्ती कापूर व अगरबत्ती पेटवून पूजा करत असल्याचे त्यांना दिसले.

त्यांपैकी एक व्यक्ती शेतातील गुप्तधन काढून देण्याबाबत बोलत होती. कथित भुताटकी दूर करण्यासाठी मंत्र म्हणावे लागतील आणि मिळणारे धन आपसांत वाटून घेऊ, असे ती व्यक्ती सांगत असल्याचे भांगरे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. ग्रामस्थ जवळ आल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तींनी तेथून पळ काढल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

छोटा खड्डा आणि पूजेचे साहित्य आढळले

संबंधित व्यक्ती निघून गेल्यानंतर ग्रामस्थांनी त्या जागेची पाहणी केली. तेथे खोदलेला छोटा खड्डा, त्यामध्ये पेटवलेला कापूर, उदबत्त्या आणि इतर पूजासाहित्य आढळल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर राजेंद्र दगडू भांगरे, बाळू भाऊराव भांगरे आणि शिवाजी भाऊराव भांगरे यांच्या मदतीने परिसरात शोध घेण्यात आला. या शोधात सात जण मिळून आले. घटनास्थळाजवळ एक चारचाकी आणि एक दुचाकीही आढळली. चौकशीदरम्यान संबंधितांनी गुप्तधन शोधण्यासाठी आल्याचे सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

सात जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तींना शेंडी गावठाणातील मारुती मंदिराजवळ आणून त्यांची नावे आणि पत्ते विचारले. त्यांनी योगेश गणेश वानखेडे, त्र्यंबक रावजी वानखेडे, अनंता कृष्णराव हिंगोले, गणेश रामहरी घोरपडे, रुपेश गणेश वानखेडे, ज्ञानेश्वर नामदेव लेंडे आणि संजय लक्ष्मण खाडे अशी नावे सांगितली.

यांपैकी काही जण अकोला जिल्ह्यातील, तर दोघे अकोले तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. ग्रामस्थांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर राजूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सातही जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

पसार आरोपींचा शोध; पुढील तपास सुरू

या घटनेप्रकरणी महाराष्ट्रातील नरबळी व अमानुष कृत्यांना प्रतिबंध करणाऱ्या कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

प्रकरणातील आणखी दोन आरोपी पसार असल्याची माहिती राजूर पोलिसांनी दिली आहे. मात्र, घटनास्थळावरून पळून गेलेल्यांची संख्या अधिक असू शकते, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सहभागी व्यक्तींची नेमकी संख्या आणि प्रत्येकाची भूमिका याबाबत तपास सुरू आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा