ahilyanagar : पाण्यासाठी समृद्धी महामार्गावर अडीच तास ठिय्या! महिलांसह शेतकऱ्यांचे आंदोलन

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: November 1, 2026

श्रीरामपूर : वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांना नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन शनिवारी समृद्धी महामार्गावर पोहोचले. जांबरगाव हद्दीत महिलांसह शेतकऱ्यांनी सुमारे अडीच तास ठिय्या देत पाणी सोडण्याची निश्चित तारीख जाहीर करण्याची मागणी केली. आंदोलकांना ताब्यात घेताना चिंचडगावचे शेतकरी अनिल काळे जखमी झाले. पोलिसांनी डोक्यावर लाठी मारल्याचा आरोप त्यांनी केला असून, त्यांच्यावर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रब्बी पिकांसह पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन

रब्बी हंगामातील पिकांची गरज आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन कालव्यातून आवर्तन सोडावे, अशी आधार जलदूत समितीची मागणी आहे. समितीचे पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी २७ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकारी आले नसल्याचा आरोप करत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच दिवशी सायंकाळपासून कालवा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. उपोषण सुरू असतानाही प्रशासनाकडून चर्चेसाठी प्रतिसाद मिळाला नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

नऊ ठिकाणच्या रास्ता रोकोनंतर महामार्गावर धडक

पाणीप्रश्नावर निर्णय होत नसल्याने शुक्रवारी लाडगाव, चौदा मैल यांसह नऊ ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता. त्यानंतरही मागणीची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी शनिवारी आंदोलनाची व्याप्ती वाढविली.

पोलीस बंदोबस्त असतानाही आंदोलक जांबरगाव हद्दीतील समृद्धी महामार्गावर पोहोचले. महिला आंदोलकांनी महामार्गाच्या एका बाजूला बसून ठिय्या दिला. पाणी सोडण्याबाबत स्पष्ट निर्णय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव; बैठकीचे आश्वासन

आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, केवळ आश्वासनाऐवजी पाणी सोडण्याची तारीख सांगावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी कायम ठेवली.

जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता सुनंदा जगताप आणि अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांनीही आंदोलकांशी चर्चा केली. २ नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन पाणी सोडण्याच्या मागणीवर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, आवर्तनाबाबत ठोस निर्णय न मिळाल्याने आंदोलकांचे समाधान झाले नाही.

ताब्यात घेताना शेतकरी जखमी झाल्याने वाद

चर्चेनंतरही तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी महामार्गाचा संपूर्ण रस्ता व्यापून बसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे आणि जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी आंदोलकांना जबरदस्तीने ताब्यात घेऊ नये, अशी विनंती केली.

महिला आंदोलकांना ताब्यात घेतले जात असताना अनिल काळे यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत जाब विचारला. त्यानंतर पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान डोक्यावर लाठी मारण्यात आल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. जखमी झालेल्या काळे यांना उपचारासाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलीस ठाण्यातही ठिय्या देऊन निषेध

महामार्गावरून ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना वैजापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथेही त्यांनी ठिय्या देत पोलीस कारवाईचा निषेध केला. पाण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेण्याची आवश्यकता काय होती, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी तातडीच्या निर्णयाची मागणी केली.

उपोषणकर्ते पंडित शिंदे यांची प्रकृती खालावली

दरम्यान, आमरण उपोषण करणारे पंडित शिंदे यांची प्रकृती खालावत असल्याने नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी त्यांना सलाईन घेण्याची विनंती केली. त्यानंतर शिंदे यांनी सलाईन लावण्यास संमती दिली. पाणी सोडण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी २ नोव्हेंबर रोजी बैठक घेण्याचे आश्वासन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा