Ahilyanagar Crime : कोतवाली पोलिसांनी हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला आण्णाभाऊ साठे वसाहत माळीवाडा परिसरातून जेरबंद केले आहे.
ही कारवाई ३१ ऑगस्ट रोजी दुपारी करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन अनिल गायकवाड (वय ३५, रा. आण्णाभाऊ साठे वसाहात, माळीवाडा, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. माळीवाडा परिसरात हातात तलवार घेऊन एक जण दहशत करीत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. त्यानुसार
गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस अंमलदार विनोद बोरगे, विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके, अतुल काजळे, महेश पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यावेळी सचिन गायकवाड हा आण्णाभाऊ साठे वसाहतीजवळ रस्त्यावर हातात तलवार घेऊन दशहत निर्माण करताना आढळून आला.
त्याला तत्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक तलवार व तीन कोयते जप्त केली. पोलीस अंमलदार विनोद बोरगे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.














