Ahilyanagar Politics News : कर्जत नगरपंचायतीतील राजकारणात मोठे वळण आले असून, सत्तांतराचे नाट्य रंगले आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कर्जत नगरपंचायतीवर नियंत्रण मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा झटका दिला आहे.
सन 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी 12 नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचे तीन आणि भाजपचे केवळ दोन नगरसेवक निवडले गेले होते. महाविकास आघाडीची एकत्रित सत्ता नगरपंचायतीवर होती.
मात्र आता परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादीतील आठ नगरसेवकांनी भाजपकडे झुकाव दर्शवला असून, काँग्रेसचेही तिन्ही नगरसेवक भाजपसोबत गेले आहेत. याआधी भाजपकडून दोन आणि महाविकास आघाडीतील 11 नगरसेवकांनी मिळून नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यामुळे सत्तेत मोठी उलथापालथ झाली.
पवार विरुद्ध शिंदे संघर्ष तीव्र
नगराध्यक्ष पदावरून नगरसेवकांना हटवण्याचा अधिकार देणारा राज्य सरकारचा नवीन अध्यादेश आल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले. या पार्श्वभूमीवर रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यात जोरदार वादविवाद झाले. पवार यांनी सरकारवर सत्ता राखण्यासाठी कायद्यात फेरबदल केल्याचा आरोप केला, तर शिंदे यांनी याला कडवे प्रत्युत्तर दिले.
नगराध्यक्षांचा राजीनामा
सभा सुरू होण्याआधीच उषा राऊत यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी वैयक्तिक कारणे दिली असली तरी माध्यमांशी बोलताना त्यांनी राम शिंदेंवर गंभीर आरोप केले. त्यांनी पैसे आणि सत्तेचा वापर करून नगरसेवकांवर दबाव टाकण्यात आल्याचा दावा केला. तसेच, एका ओबीसी महिलेला पदावरून हटवण्यासाठी सत्तेचा गैरवापर झाल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचा जोरदार पलटवार
या आरोपांवर भाजपने तातडीने प्रतिक्रिया दिली. नगरसेवकांनी कोणावर दबाव टाकला गेला की कोणाकडून आमिष दिले गेले, याचे पुरावे आमच्याकडे असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. तसेच वेळ आली तर हे पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले.
भाजपकडे गेलेल्या नगरसेवकांनी देखील स्पष्टपणे सांगितले की, आम्हाला कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवले गेले नाही. जर उषा राऊत यांनी ठरल्याप्रमाणे अडीच वर्षानंतर पदाचा राजीनामा दिला असता, तर हे नाट्य उद्भवलं नसतं, असे त्यांनी नमूद केले.
भविष्यातील राजकीय संघर्ष
2022 च्या निवडणुकीनंतर रोहित पवारांनी भाजपच्या नगरसेवकांना आपल्याकडे वळवून सत्ता मिळवली होती. मात्र आता तेच नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये परतल्याने पवारांना मोठा धक्का बसला आहे. कर्जत आणि अहिल्यानगर परिसरात ही चर्चा रंगली असून, पुढील काळात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होणार हे निश्चित मानले जात आहे.








