अहिल्यानगर : व्यवसायासाठी घेतलेल्या ८० लाख रुपयांच्या कर्जाची मुद्दल आणि व्याजासह एक कोटी २९ लाख रुपये परतफेड केल्यानंतरही आणखी पैशांसाठी छळ करण्यात आल्याची तक्रार एका व्यावसायिकाने केली आहे. भरलेली संपूर्ण रक्कम केवळ व्याजाची असल्याचे सांगत जमीन आणि फ्लॅट विकून पैसे देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप फिर्यादीत आहे. तसेच जमीन नावावर करण्यास नकार दिल्यानंतर मारहाण करून जबरदस्तीने वाहनातून अज्ञातस्थळी नेल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात किशोर सानप, अश्विनी सानप, संगीता सानप आणि प्रल्हाद खाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता सानप यांचा मृत्यू झाल्याची नोंद असून, प्रल्हाद खाडे याचे पूर्ण नाव आणि पत्ता उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
व्यवसायासाठी घेतले होते ८० लाख रुपये
गणेश माणिक फुंदे, वय ४२, सध्या राहणार उल्हासनगर, जिल्हा ठाणे व मूळ राहणार नारायणडोहो, तालुका अहिल्यानगर, यांनी शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी पोलिसांत फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार, फुंदे आणि त्यांचे मित्र योगेश भिसे यांनी व्यवसायासाठी किशोर सानप याच्याकडून ८० लाख रुपये व्याजाने घेतले होते. या व्यवहारातील मुद्दल आणि व्याजाच्या परतफेडीसाठी किशोर सानप व त्याची पत्नी अश्विनी सानप यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण एक कोटी २९ लाख रुपये जमा केल्याचा फुंदे यांचा दावा आहे.
भरलेले पैसे केवळ व्याज असल्याचे सांगून दबाव
इतकी रक्कम दिल्यानंतरही कर्जाचा व्यवहार संपल्याचे मान्य करण्यात आले नाही, असे फुंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे. आतापर्यंत मिळालेले पैसे केवळ व्याजापोटी असल्याचे सांगून किशोर सानप याने अतिरिक्त रकमेची मागणी सुरू केल्याचा आरोप आहे.
किशोर आणि अश्विनी सानप हे उल्हासनगरमधील फुंदे यांच्या कार्यालयातही गेले होते. तेथे व्यवहारातील पैसे देण्याची मागणी करत गावाकडील जमीन आणि फ्लॅट विकून रक्कम उभी करण्यासाठी धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घरासमोर आरडाओरड करून बदनामी केल्याचा आरोप
तक्रारीत नमूद केल्यानुसार, १७ आणि १८ मार्च रोजी सानप दाम्पत्य नारायणडोहो येथील फुंदे यांच्या घरासमोर गेले होते. फुंदे यांनी पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांनी आरडाओरड केली.
या प्रकारामुळे नातेवाइकांमध्ये आपली बदनामी झाल्याचे फुंदे यांनी म्हटले आहे. पैशांच्या मागणीसाठी कार्यालयापाठोपाठ मूळ गावीही दबाव आणण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.
व्यवहार मिटविण्याच्या कारणावरून नोंदणी कार्यालयात बोलावले
२० मार्च २०२३ रोजी किशोर आणि अश्विनी सानप पुन्हा नारायणडोहो येथील घरी आले. कर्जाचा व्यवहार मिटविण्यासाठी नोंदणी कार्यालयात येण्यास त्यांनी सांगितले. तसे न केल्यास गावात बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानंतर फुंदे आणि त्यांचे आई-वडील वाहनातून अहिल्यानगरमधील पराग बिल्डिंग परिसरातील नोंदणी कार्यालयात गेले. तेथे किशोर व अश्विनी यांच्यासोबत संगीता सानप आणि प्रल्हाद खाडे हेही उपस्थित असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
जमीन नावावर करण्यास नकार दिल्यानंतर मारहाणीची तक्रार
नोंदणी कार्यालयात फुंदे यांच्या आई-वडिलांनी वडिलोपार्जित जमीन सानप यांच्या नावावर करण्यास नकार दिला. त्यानंतर उपस्थित चौघांनी फुंदे यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे.
फुंदे यांना जबरदस्तीने वाहनात बसवून नगर-पाथर्डी रस्त्याने चांदबीबी महालाच्या दिशेने अज्ञातस्थळी नेण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. जमीन विकून पैसे आणण्यास सांगत, रक्कम मिळेपर्यंत सोडणार नसल्याची धमकी दिल्याचा आरोप फुंदे यांनी केला आहे. कोतवाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.








