शिर्डी- शिर्डी शहरात १७ ऑगस्ट रोजी मागील भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादातून १८ वर्षीय तरुणाचा लाथा-बुक्के आणि चाकूच्या वाराने खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेत सानूकुमार ठाकूर (वय १८, रा. शिर्डी) याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी दोन आरोपींना अवघ्या दोन तासांत गजाआड केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयताचे वडील नवीनकुमार बालबोध ठाकूर (वय ४५, रा. श्रीरामनगर, शिर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास श्री साईमंदिर गेट नंबर ६ समोरील बालाजी भवन येथे ही घटना घडली. सानूकुमार ठाकूर आणि आरोपी साई कुमावत व शुभम गायकवाड (दोघेही रा. शिर्डी) यांच्यात मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला.
भांडण मिटवण्याच्या प्रयत्नात बाचाबाची सुरू असतानाच आरोपींनी सानूकुमारवर लाथाबुक्के मारले. दरम्यान, साई कुमावतने त्याच्याकडील चाकू काढून सानूकुमारच्या छातीत वार केला. गंभीर जखमी झालेल्या सानूकुमारचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपी वार करून आरोपी चाकूसह घटनास्थळावरून फरार झाले. सहकाऱ्यांनी जखमी अवस्थेत सानूकुमारला रिक्षाने साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शिर्डी उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेतला आणि अवघ्या दोन तासांत साई कुमावत व शुभम गायकवाड यांना अटक केली. त्यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे – यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर काळे करीत आहेत.














