पाथर्डी- पोलिसांनी कार्यतत्परता आणि प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण घालत एका वयोवृद्ध महिलांचे दोन लाख रुपये किमतीचे दागिने व इतर साहित्य परत मिळवून दिले. विशेष म्हणजे, या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल नव्हती. मात्र गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून पोलिसांनी महिलेला तिचे मौल्यवान ऐवज परत दिले.
सुभद्रा शंकर डोंगरे (वय ८०, रा. श्रीरामपूर) या आजीबाई दरवर्षीप्रमाणे भगवानगड व मोहटादेवी येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. ५ ऑगस्ट रोजीच्या या प्रवासादरम्यान त्यांची दोन तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल, कपडे व कागदपत्र असलेली पिशवी हरवली. वृद्धापकाळामुळे त्यांना सुरुवातीला हे लक्षातच आले नाही.
त्याच दिवशी एका गावातील दुसऱ्या महिलेला ही पिशवी मिळाली. मात्र, त्यात सोन्याचे दागिने व इतर महत्त्वाचे साहित्य असल्याने ती पिशवी कोणाची हे शोधणे गरजेचे होते. याच काळात पाथर्डी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांना या संदर्भात माहिती मिळाली.
पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी तत्काळ पथक तयार करून पोलीस कॉन्स्टेबल सागर बुधवंत, इजाज सय्यद व महिला पोलीस कर्मचारी मनिषा धाणे यांना शोधमोहीमेचे आदेश दिले. पिशवी हस्तगत करून त्यातील आधारकार्ड व मोबाईलवरील नंबरच्या आधारे ओळख पटवण्यात आली.
श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी टेकाळे यांच्या सहकार्याने डोंगरे कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला. अखेर पिशवीतील सर्व वस्तूंसह सोन्याचे दागिने सुरक्षितपणे सुभद्रा डोंगरे यांच्या स्वाधीन करण्यात आले.
या घटनेमुळे पाथर्डी पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि नागरिकाभिमुख कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वयोवृद्ध महिलेला मिळालेला दिलासा म्हणजे पोलिसांवरील विश्वास वाढवणारा क्षण ठरला आहे.














