पाथर्डी- चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकाने अत्याचार केल्याचा प्रकार तालुक्यातील एका शाळेमध्ये घडला आहे. शिक्षण विभागाला काळिमा फासणारी घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील एका शाळेमध्ये कामगाराची मुलगी चौथीच्या वर्गामध्ये शिकत आहे. वर्ग शिक्षकाने या बालिकेवर अत्याचार केल्यामुळे मुलीच्या अंगावर जखमा झाल्याचीही चर्चा आहे. मुलीच्या पालकांनी मुलीवर उपचार केल्याचे समजते.
शाळा ज्या गावात आहे त्या गावातील एका स्थानिक पुढाऱ्याने या प्रकरणात मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार घडल्याचीही चर्चा आहे. मध्यस्थाने आर्थिक गैरव्यवहार करून त्यातील काही रक्कम मुलीच्या पालकांना दिल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे या प्रकरणात तक्रार दाखल झाली नाही. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली असून, चौकशीत काय आढळले हे मात्र गुलदस्त्यात आहे. शिक्षण विभागाच्या वरिष्ठांनी देखील हे प्रकरण मिटवले पाहिजे, अशीच भूमिका घेतल्याची चर्चा आहे. शिक्षण विभागाला मान खाली घालावी लागणारी अशी ही घटना असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. अहिल्यानगर येथील उडाणच्या टीमकडून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, शिक्षण क्षेत्रातील सर्वच लोक हादरुन गेले आहेत. या घटनेची तालुकाभर दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. गुरुवारी याबाबत अहिल्यानगर येथील उडाणचे सहकारी व पाथर्डीतील स्थानिक कार्यकर्ते या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे समजते.














