तालुक्यातील घटनेने संतापाची लाट
पारनेर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलींना धमकावून छेडछाड आणि अत्याचार केल्याच्या गंभीर घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी सात संशयितांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पीडित मुलींच्या आई-वडिलांनी दिलेल्या दोन स्वतंत्र तक्रारींवरून पारनेर पोलीस ठाण्यात पोस्को कायदा, अत्याचार आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
मुलींना धमकी देत वाहनातून नेल्याचा आरोप
पहिली तक्रार एका पीडित मुलीच्या आईने दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ९ मार्च रोजी दुपारी सुमारे चारच्या सुमारास त्या पारनेर येथून घरी परतल्या. काही वेळानंतर त्यांच्या दोन्ही मुली घरी आल्या. मुलींच्या वागण्यात संशय वाटल्याने आईने लहान मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी मुलीने सांगितले की, विशाल हुलावळे, प्रथमेश लोंढे आणि वैभव लोंढे यांनी रोहित चत्तर याच्या (एमएच १२ एएफ ६६२५) वाहनातून त्यांना वेसदरे परिसरात फिरण्यासाठी नेले होते.
तसेच तुमचे आमच्याकडे फोटो आहेत आणि तुम्ही आमच्यासोबत आली नाहीत तर ते फोटो व्हायरल करू, अशी धमकी दिल्याचेही मुलीने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रवासादरम्यान संबंधित तरुणांनी मुलींशी अयोग्य वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनास्थळी पोहोचताच आरोपींचा पलायन
घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीचे काका घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यांना पाहताच संशयितांनी वाहनासह तेथून पलायन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीडित मुलीकडे सविस्तर चौकशी करण्यात आली असता आणखी काही घटना समोर आल्याचे सांगण्यात आले आहे.
मंदिरात बोलावून छेडछाडीचा प्रकार
पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, २ मार्च रोजी दुपारी सुमारे एकच्या सुमारास शुभम आल्हाट हा तिच्या घरासमोर आला होता. त्याने मंदिरात येण्यास सांगत धमकी दिली. जर मंदिरात आली नाहीस तर तुझे फोटो व्हायरल करेन, असे सांगितल्याने भीतीपोटी मुलगी मंदिरात गेली. तेथे शुभम आल्हाट याने तिच्याशी अयोग्य वर्तन करत विनयभंग केला आणि तिचे फोटो काढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दुसऱ्या तक्रारीत अत्याचाराचा आरोप
या प्रकरणात दुसरी तक्रार एका अन्य पीडित मुलीच्या वडिलांनी दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, त्यांच्या कुटुंबातील मोठी मुलगी दहावीमध्ये तर धाकटी मुलगी सातवीमध्ये शिक्षण घेत आहे. धाकट्या मुलीवर झालेल्या छेडछाडीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या मुलीनेही स्वतःवर झालेल्या अत्याचाराची माहिती कुटुंबीयांना दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.
ओळखीचा गैरफायदा घेत अत्याचार
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, मोठ्या मुलीची ओळख प्रसाद संदीप साळवे याच्याशी झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत प्रसाद साळवे याने २५ डिसेंबर रोजी मुलीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतरही तिला धमकावत राहिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
धमकी देत पुन्हा अत्याचाराचा आरोप
तक्रारीनुसार, प्रसाद साळवे याने घडलेल्या प्रकाराची माहिती अनिल उर्फ गुंड्या किशोर साळवे याला दिली होती. त्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी अनिल साळवे याने शाळेजवळ पीडित मुलीला अडवले. प्रसादने केलेल्या अत्याचाराची माहिती असल्याचे सांगत, तू माझ्या घरी आली नाहीस तर ही माहिती सर्वत्र व्हायरल करेन, अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अनिल साळवे याने मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सात संशयितांविरोधात गुन्हे दाखल
या दोन्ही तक्रारींच्या आधारे पोलिसांनी प्रसाद संदीप साळवे, अनिल उर्फ गुंड्या किशोर साळवे, विशाल अनिल हुलावळे, प्रथमेश शंकर लोंढे, वैभव पोपट लोंढे, शुभम आल्हाट आणि रोहित संजय चत्तर (सर्व रा. कान्हूरपठार, ता. पारनेर) यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. प्रकरणात पोस्को कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.














