अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेसमोर रात्रीच्या अंधारात रिक्षा चालकास कार आडवी लावून लुटले

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 11, 2025

अहिल्यानगर- शहरातील स्टेशन रस्त्यावर जिल्हा सहकारी बँकेसमोर रात्रीच्या अंधारात रिक्षाला कार आडवी लावून तिघांनी रिक्षा चालकास धमकी देऊन मोबाईल, रोख रक्कम असा ७ हजार ९०० रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना ८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता घडली.

याबाबत रिक्षाचालक विनोद दिलीप उल्हारे (वय ४६, रा. निंबोडी, ता. नगर) याने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले, सुनील पवार यांची रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी भाडेतत्त्वावर वापरतो. ८ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता फिर्यादी यांनी मुलगा सूरज याच्यासह आर्मी टँक म्युझियम येथून चार ते पाच पॅसेंजर बसवून माळीवाडा बस स्थानकाच्या दिशेने रिक्षा घेऊन आले.

सहकारी बँकेसमोर पोहोचताच पाठीमागून एक मोटारकार आली. त्यांच्या रिक्षासमोर आडवी लावण्यात आली. मोटारकारमधून अंदाजे २० ते २५ वयोगटातील तिघे जण खाली उतरले. तुझ्या रिक्षाने आमच्या मोटारीला धक्का दिला असून, भरपाई दे अशी दमबाजी केली. त्यांना प्रतिकार करताच खिशातील ५०० रुपये हिसकावून घेतले.

त्यानंतर त्यांनी रिक्षातील पॅसेंजरना धमकावत भाड्याचे पैसे स्वतःकडे घेण्यास भाग पाडले. एकाने सात हजार रपये किंमतीचा मोबाईल हिसकावून घेत पळ काढला. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार योगेश कवाष्टे करीत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा