महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पावर स्थायी समितीत झालेल्या बैठकीत विविध विकासकामांवर सखोल चर्चा रंगली. शहराच्या विकासासाठी निधीचे योग्य नियोजन, महसूलवाढ आणि नागरिकांना दिलासा देणारे निर्णय यावर भर देण्यात आला. याच बैठकीत शहरातील पत्रकार चौकात अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस सभापती सुभाष लोंढे यांनी मांडली.
विकासकामांसाठी विविध निधी प्रस्तावित
सभेत शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी विविध योजनांसाठी निधी देण्याच्या सूचना नगरसेवकांकडून मांडण्यात आल्या. अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सवासाठी 25 लाख रुपये, पिंपळगाव माळवी येथे नशामुक्ती केंद्र उभारणी, एकल महिलांसाठी वसतिगृह, बालकांसाठी संस्कार केंद्र यासाठी एक कोटी रुपयांचा निधी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या योजनांमुळे विविध घटकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून आले.
बजेटवर सदस्यांची तीव्र नाराजी
बुधवारी पार पडलेल्या या बैठकीत महापालिकेच्या अर्थसंकल्पावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. उत्पन्न आणि खर्च यामध्ये मोठा तफावत असल्याचे नमूद करत सादर केलेले बजेट फुगवलेले आणि दिशाभूल करणारे असल्याचा आरोप करण्यात आला. अपेक्षित 201 कोटी रुपयांच्या तुलनेत केवळ 60 कोटींची वसुली झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले, तर खर्चाचा आकडा 350 कोटींपर्यंत पोहोचल्याने आर्थिक तुटीचे संकट गंभीर असल्याचे सदस्यांनी मांडले.
महसूल वाढीसाठी ठोस उपायांची मागणी
महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी ठोस पावले उचललेली नसल्याची टीका करत घरपट्टी, पत्राशेड आणि जाहिरात फलक यांसारख्या स्रोतांमधून महसूल वाढवण्याची संधी असल्याचे सदस्यांनी अधोरेखित केले. तसेच अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवून प्रशासनिक खर्चात कपात करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आणि पर्यावरणीय मुद्दे
शहरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगत त्यावर नियंत्रणासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली. यासोबतच बेकायदेशीर वृक्षतोडीवरही सदस्यांनी आक्षेप घेत दोषींवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. आयुक्त यशवंत डांगे यांनी विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला.
पाणीपट्टी थकबाकी आणि वादाचा मुद्दा
मुळा धरणाच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा घेणाऱ्या गावांकडून सुमारे 150 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत असल्याचा मुद्दा चर्चेत आला. ही थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अन्यथा संबंधितांचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी करण्यात आली. या मुद्द्यावरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद स्पष्टपणे दिसून आले.
पाणीपट्टी दरकपातीची मागणी
पाणीपट्टी दरवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे लक्षात घेऊन दरात 25 टक्के कपात करण्याची शिफारस सभापती सुभाष लोंढे यांनी केली. यावर आयुक्त डांगे यांनी उत्तर देताना सांगितले की, गेल्या 22 वर्षांनंतर प्रथमच पाणीपट्टीत वाढ करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी 50 कोटींचा खर्च होत असताना वसुली केवळ 10 कोटी इतकीच होती. त्यामुळे दर 1500 रुपयांवरून 2400 रुपये करण्यात आले असून, महसूल वाढवण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नव्या सर्वेक्षणाच्या आधारे घरपट्टी आकारणी केली जात असून, तक्रारींवर सुनावणीची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही देण्यात आली.








