Ahilyanagar Honeytrap : अकोले पोलिसांनी सापळा रचून महिलेला पैसे घेताना रंगेहात पकडले असून अकोले तालुक्यातील हनीट्रॅपचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. संगमनेर तालुक्यातील ३७ वर्षीय पुरुषाच्या फिर्यादीवरून तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगचा बळी पडलेल्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, माहिती गुप्त ठेवली जाईल, असे आवाहन पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी केले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की संगमनेर तालुक्यातील ३७वर्षीय पुरुषाने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन महिन्यांपूर्वी त्याची एका महिलेबरोबर ओळख झाली. मोबाईल नंबर देऊन दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरू झाले.
नंतर महिलेने फिर्यादीला वडगावपान येथे बोलावले. तेथे तिने आपल्याला फिर्यादी आवडतो व त्याच्यावर प्रेम करायचे आहे, असे सांगितले. फिर्यादीने आपले लग्न झाले असून दोन मुले असल्याचे सांगितले तरीही त्या महिलेने हे गुपित राहील, असे आश्वासन दिले. नंतर दोघे वडगावपान येथील लॉजवर गेले.
काही दिवसांनी १९ ऑगस्ट २०२५ रोजी महिलेने आपल्या अकोले येथील मैत्रिणीचा नंबर दिला. फिर्यादीने फोन केल्यावर अकोलेला येण्यास सांगितले. विरगाव रोडवरील क्रशरजवळ बोलावून एका इसमाशी भेट घडवली. त्या इसमाने फिर्यादीस खोलीत नेले. तिथे एक महिला होती. काही वेळाने बाहेर पडताना दरवाजा बाहेरून बंद करण्यात आला.
आरडाओरड केल्यावर एक महिला व पुरुष आले. त्या पुरुषाने “ही माझी पत्नी आहे, तू तिच्यासोबत काय करत आहेस?” असे म्हणून व्हिडिओ शूटिंग सुरू केले व मारहाण केली. त्यानंतर १ लाख रुपये दिल्यास प्रकरण मिटेल, असे सांगण्यात आले. फिर्यादीने १५ हजार रुपये
(७ हजार रोख व ८ हजार ऑनलाईन) देऊन सुटका करून घेतली. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या महिलेने फिर्यादीशी संपर्क साधला. तिने अकोले येथील मंदिराजवळ भेटून ४५ हजार रुपये घेतले. त्यानंतर वेळोवेळी ब्लॅकमेल करून १० हजार रुपये फोनपेद्वारे, तर १४ हजार रुपये संगमनेर स्टँडवर रोख असे वेगवेगळे पैसे घेतले. तरीही पैशांची मागणी सुरूच होती.
दि. २९ ऑगस्ट रोजी महिलेने पुन्हा पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. सततच्या छळाला कंटाळून फिर्यादीने अकोले पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खांडबहाले यांनी सापळा लावला. फिर्यादीकडील ६ हजार रुपये देऊन ती महिला घेण्यासाठी आली असता पोलिसांनी महात्मा फुले चौकात तिला रंगेहात पकडले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही महिलांना ताब्यात घेऊन त्यांना समज देण्यात आली असून वेळोवेळी तपासासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक खांडबहाले करत आहेत.
हनीट्रॅपची व्याप्ती
या घटनेची व्याप्ती मोठी असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. महिलांकडून हनीट्रॅप करून ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले असून लोक प्रतिष्ठा आणि बदनामीला घाबरून याचा बळी पडतात. जर कुणी अशा प्रकाराला बळी पडले असेल, तर घाबरून न जाता अकोले पोलिसांशी संपर्क साधावा. नाव आणि ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी केले आहे.








