एका अंदाजे २८ ते ३० वयाच्या युवकास पेट्रोल टाकून जाळून मारल्याची घटना नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण गावाजवळील असलेल्या कुकडी कॅनॉलच्या कडेला १८ जून रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास उघडकीस आली आहे.
नारायण गव्हाण गावातील काही नागरिक सकाळी कॅनॉलच्या कडेने मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना अर्धवट जळलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही बाब सुपा पोलिसांना कळविली. ही माहिती मिळताच सुपा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
सदर मयत इसमाचे वय अंदाजे २८ ते ३० असून केस लांब आहेत. त्याला पेट्रोल टाकून जाळण्यात आले असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असून शवविच्छेदन अहवाल आल्यावर त्याचा अगोदर खुन करून पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्यात आले की जाळूनच मारण्यात आले हे स्पष्ट होईल असे स.पो.नि. दिवटे यांनी सांगितले. या मयताची ओळख पटलेली नसून याबाबत कोणाला काही माहिती असल्यास संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या सह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी भेट देत पाहणी केली.








