अहिल्यानगर- शहरातील खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करीत विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवत नगरचे नावलौकिक वाढवत आहेत. खेळाडूंच्या पाठीशी कायम उभे राहून त्यांना प्रोत्साहन मी देत आहे. खेळाडूंना चांगल्या सोई सुविधांसह सरावा करता यावा यासाठी अहिल्यानगर शहरात सर्वप्रकारच्या खेळांसाठी अद्यावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लवकरच उपलब्ध होणार आहेत.
या अद्यावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा लाभ सर्व खेळाडूंनी घेत अजून चांगली कामगिरी करावी, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले. कोल्हापूर येथे झालेल्या सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य कुराश स्पर्धेत अहिल्यानगर संघाने उपविजेतेपद मिळवत भरघोस पदकांची कमाई केली. या उपविजेत्या संघातील खेळाडूंचे आमदार संग्राम जगताप यांनी कौतुक करीत सन्मान केला.
यावेळी खेळाडूंचे प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य धोपावकर, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या अहिल्यानगरचे सचिव नीलेश मदने, उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले, प्रा. माणिक विधाते आदींसह खेळाडू व पालक उपस्थित होते.
यांचा झाला सन्मान
सुवर्णपदक प्राप्त : अनुज बोगा, सम्राट करंजुले, ऋचा बोगा, सिद्धी दातरंगे व युवराज आव्हाड, रौप्यपदक प्राप्त आर्या शिंदे, यशराज गोंधळे, वंश बोरा, खनिका गुप्ता व श्लोक सब्बन. कास्यपदक प्राप्त : मल्हार सुरसे, ओम पोकळे, अनन्या लखापती व अमृता झिंजे या खेळाडूंचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.








