सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव फाट्याजवळ शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाला. देवदर्शनासाठी जात असताना भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत जागीच चार जणांचा मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांनी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गमावले. या मृतांमध्ये शेकटे बुद्रुक (ता. शेवगाव) येथील २२ वर्षीय विशाल श्रीकिसन काकडे याचाही समावेश आहे.
शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बीड शहरालगतच्या नामलगाव फाट्याजवळील एसआर जिनिंग परिसरात हा अपघात झाला. भाविकांचा गट नेहमीप्रमाणे पेंडगाव (ता. गेवराई) येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी निघाला होता.
याचदरम्यान भरधाव कंटेनर (क्र. एमएल-१ एजी-३१९७) ने सहा जणांना जोरदार धडक दिली. घटनास्थळी ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत जखमींना उपचारासाठी हलवले; मात्र त्यातील सर्वांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये शेकटे बुद्रुकचा विशाल काकडे याचा समावेश आहे. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून तो बीड जिल्ह्यातील शिदोड येथे राहून वडिलांच्या नातलगाबरोबर पाटबंधारे विभागाच्या साइटवर पोकलेन चालक म्हणून काम करत होता. मेहनती व कुटुंबाला आधार देणारा म्हणून त्याची ओळख होती.
शनिवारी संध्याकाळी शेकटे बुद्रुक येथे त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, मोठा भाऊ व चुलते असा परिवार आहे. तो कुटुंबातील धाकटा मुलगा होता. त्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.








