डिजिटल जगात एका क्लिकची किंमत कधी कधी हजारो रुपयांत मोजावी लागू शकते. अलीकडे सोशल मीडियावर “चिची कॉल व्हिडिओ” या नावाने काही पोस्ट, रील्स आणि लिंक मोठ्या वेगाने फिरताना दिसत आहेत. लीक झालेला खासगी व्हिडिओ, घोटाळा उघडकीस, एक्सक्लुझिव्ह क्लिप असे आमिष दाखवून वापरकर्त्यांना क्लिक करण्यास भाग पाडले जाते. मात्र सायबर तज्ज्ञांच्या मते, हा सगळा प्रकार “घोस्ट फाइल” नावाच्या सुनियोजित ऑनलाइन फसवणुकीचा भाग आहे.
हा ट्रेंड नेमका कशामुळे वाढला?
फिलिपिन्समधील जीवनशैली आणि प्रवास विषयक प्रभावशाली व्यक्ती Vera Hill, जी ऑनलाइन “चिची” म्हणून ओळखली जाते, तिचे नाव या व्हायरल ट्रेंडशी जोडले जात आहे. तिचा कथित खाजगी व्हिडिओ लीक झाल्याचा दावा काही पोस्टमध्ये करण्यात येतो. मात्र कोणत्याही अधिकृत किंवा विश्वासार्ह स्त्रोतावर असा व्हिडिओ उपलब्ध नाही.
तज्ज्ञांचे निरीक्षण असे आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या क्लिप्स या संपादित, दिशाभूल करणाऱ्या किंवा पूर्णपणे बनावट असू शकतात. लोकांच्या कुतूहलाचा फायदा घेत खोट्या माहितीचा बाजार मांडला जातो.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कसा पसरतो हा सापळा?
हा प्रकार प्रामुख्याने TikTok, Facebook, Telegram आणि Reddit यांसारख्या प्लॅटफॉर्मवर वेगाने पसरतो. आकर्षक कॅप्शन, धक्कादायक थंबनेल आणि “पूर्ण व्हिडिओ येथे पहा” अशा संदेशांसह लिंक शेअर केल्या जातात.
एकदा वापरकर्त्याने लिंकवर क्लिक केले की त्याला बनावट स्ट्रीमिंग पेजवर नेले जाते. तिथून पुढे फिशिंग साइट, बनावट लॉगिन पेज किंवा संशयास्पद डाउनलोड पॉप-अप दिसू लागतात.
घोस्ट फाइल घोटाळा नेमका कसा काम करतो?
हा घोटाळा “एसईओ पॉयझनिंग” तंत्रावर आधारित असतो. म्हणजेच शोधयंत्रांमध्ये विशिष्ट कीवर्ड भरून बनावट वेबसाइट्स वरच्या क्रमांकावर आणल्या जातात. “चिची व्हिडिओ कॉल फुल”, “लीक व्हिडिओ डाउनलोड” असे शब्द वापरून हजारो ब्लॉग आणि पेज तयार केले जातात.
लिंकवर क्लिक केल्यानंतर पुढील प्रकार घडू शकतात:
आयपी अॅड्रेस आणि डिव्हाइस माहिती गोळा केली जाते. बनावट फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया लॉगिन पेज उघडते आणि पासवर्ड चोरला जातो.
“व्हिडिओ पाहण्यासाठी प्लगइन इंस्टॉल करा” असा संदेश देऊन मालवेअर डाउनलोड करायला भाग पाडले जाते.
कीलॉगरद्वारे बँकिंग तपशील आणि संवेदनशील माहिती चोरली जाऊ शकते.
यापूर्वीही अशीच युक्ती वापरण्यात आली होती. वेगवेगळ्या सेलिब्रिटी किंवा खेळाडूंच्या नावाने अशाच प्रकारे खोटे टॅग वापरून लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे हा नवा प्रकार नसून जुन्या घोटाळ्याचे आधुनिक रूप आहे.
रेड फ्लॅग कसे ओळखाल?
जर एखादी लिंक वारंवार वेगवेगळ्या वेबसाइटवर पुनर्निर्देशित करत असेल, अचानक लॉगिन पेज उघडत असेल किंवा अनोळखी एक्स्टेंशन डाउनलोड करण्यास सांगत असेल तर तो स्पष्ट इशारा आहे. अधिकृत वेबसाइट्स कधीही व्हिडिओ पाहण्यासाठी अतिरिक्त प्लगइन इंस्टॉल करण्यास सांगत नाहीत.
कायदेशीर परिणामही गंभीर असू शकतात
भारतात संमतीशिवाय खाजगी किंवा डीपफेक सामग्री तयार करणे आणि प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे. Information Technology Act 2000 तसेच Bharatiya Nyaya Sanhita अंतर्गत अशा कृत्यांवर कठोर कारवाई होऊ शकते. केवळ पाहणेच नव्हे तर अशा व्हिडिओंची लिंक शेअर करणेही कायदेशीर अडचणी निर्माण करू शकते.
स्वतःचे संरक्षण कसे कराल?
खळबळजनक आणि भावनिक प्रतिक्रिया निर्माण करणाऱ्या पोस्टवर त्वरित विश्वास ठेवू नका. कोणतीही माहिती अधिकृत स्त्रोतांवरून पडताळून पाहा. संशयास्पद लिंकवर क्लिक करणे, अज्ञात अॅप किंवा एक्स्टेंशन डाउनलोड करणे टाळा. तुमच्या सोशल मीडिया आणि बँक खात्यांसाठी दोन-स्तरीय प्रमाणीकरण (2FA) सक्रिय ठेवा.
डिजिटल युगात प्रत्येक व्हायरल गोष्ट खरी नसते. कुतूहल, भीती आणि धक्का यांचा वापर करून सायबर गुन्हेगार जाळे टाकतात. म्हणूनच सजग राहणे, माहितीची खात्री करणे आणि सुरक्षित ब्राउझिंगची सवय लावणे हीच खरी सायबर सुरक्षा आहे.








