अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली असून, जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या गैरव्यवहारामुळे पोलिस यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मुद्देमाल कक्षातून ड्रग्ज चोरी करून त्याची विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर केवळ एका कर्मचार्यावर कारवाई करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
मुद्देमाल कक्षातील ड्रग्ज गैरव्यवहार उघड
श्रीरामपूर परिसरातून जप्त करण्यात आलेल्या सुमारे १४ कोटी रुपयांच्या ड्रग्जचा साठा एलसीबीच्या मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आला होता. या कक्षाची देखरेख कर्मचारी शामसुंदर गुजर याच्याकडे सोपवण्यात आली होती. तपासादरम्यान गुजर याने याच कक्षातून ड्रग्ज चोरी करून विक्री केल्याचे समोर आले. या निष्कर्षानंतर त्याच्यावर तत्काळ बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
निरीक्षकांवर कारवाई का नाही? संशय वाढला
मुद्देमाल कक्षाची थेट जबाबदारी कर्मचारी पातळीवर असली तरी त्याचे नियंत्रण पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या अखत्यारीत असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत, केवळ कर्मचारी स्तरावर कारवाई होऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने संशय अधिक गडद झाला आहे. कक्षाची चावी आणि देखरेखीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना अद्याप संरक्षण का दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अधिवेशनात आमदार ओगले यांचा आक्रमक पवित्रा
या संपूर्ण प्रकरणावर श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी अधिवेशनात तीव्र भूमिका घेतली. पोलिस यंत्रणेतच भ्रष्टाचार मुरला असल्याचा आरोप करत त्यांनी केवळ एका कर्मचार्याला जबाबदार धरणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. संपूर्ण साखळीवर कारवाई करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी पोलीस निरीक्षक कबाडी यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली.
अवैध धंद्यांचे वाढते जाळे चर्चेत
श्रीरामपूर मतदारसंघात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवहार उघडकीस येत आहेत. पाच कोटी रुपयांचा गांजा, आठ कोटी रुपयांची सुगंधी सुपारी आणि सुमारे १४ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या कारवायांनंतरही मूळ साखळीवर प्रभावी आळा बसत नसल्याने संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ड्रग्ज वितरणासाठी कुरिअरचा वापर उघड
अधिवेशनातच ड्रग्जविरोधात कठोर कारवाईची मागणी झाल्यानंतर लगेचच श्रीरामपूरमध्ये नशेची इंजेक्शन्स कुरिअरद्वारे पोहोचत असल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे अमली पदार्थांच्या वितरणासाठी नवे मार्ग वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले असून, यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
गृहराज्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे निर्देश
या प्रकरणाची दखल घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संबंधित कर्मचार्यावर बडतर्फीची कारवाई झाल्याचे सांगितले. तसेच, निरीक्षकांवर झालेले आरोप गांभीर्याने घेऊन त्याची सखोल चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.








