भारताच्या संरक्षण क्षमतेत आता एक क्रांतिकारी टप्पा गाठला जात आहे आणि तोही संपूर्णपणे देशात विकसित झालेल्या एका गुप्त ड्रोनच्या माध्यमातून. या नव्या ड्रोनमुळे चीन आणि पाकिस्तान यांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण त्याचे सामर्थ्य आणि उड्डाणक्षमता इतकी जबरदस्त आहे की, 60 डिग्री सेल्सिअस तापमानातसुद्धा ते शत्रूवर अचूक मारा करू शकते. भारतीय हवाई दलाच्या भविष्यातील रणनीतीत हे ड्रोन एक नवे पर्व ठरू शकते.
लखनऊमध्ये तयार झाले हे आधुनिक ड्रोन

कलाम लॅब्स या उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये असलेल्या स्टार्टअपने हे आधुनिक UAV तयार केले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे ड्रोन तब्बल 30,000 मीटर म्हणजे जवळपास 98,000 फूट उंचीवर उडू शकते , जे आजवर भारतीय संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व मानले जात होते. नुकतेच या ड्रोनने 9,790 मीटर उंचीवर उड्डाण करून एक मोठी पायरी पार केली असून, याचं अंतिम लक्ष्य म्हणजे जगातील सर्वाधिक उडणाऱ्या UAV पैकी एक बनवणे.

कलाम लॅब्सचे 26 वर्षीय सह-संस्थापक अहमद फराज यांनी या यशामागची प्रक्रिया उलगडून सांगितली. त्यांच्या मते, उंचावरील भागांमध्ये खास करून हिमालयीन सीमेवर शत्रूच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, आणि हे काम केवळ अशाच अत्याधुनिक, स्वायत्त पद्धतीने काम करणाऱ्या ड्रोनद्वारे शक्य आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये केलेल्या चाचणीत, हे ड्रोन 800 किमी/ताशी वेगाने झेपावले आणि फक्त 1 मीटर अचूकतेने परत आले, हे आपल्या डिझाइन आणि नेव्हिगेशन क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे.
ड्रोनची वैशिष्ट्ये

आतापर्यंत भारतात वापरात असलेले ड्रोन फारतर 5,000 मीटर पर्यंत उड्डाण करू शकत होते. पण नवीन डिझाइनमध्ये आल्यामुळे ते अत्यंत कठीण हवामान, कमी ऑक्सिजन आणि प्रचंड थंडीच्या परिस्थितीतही काम करू शकते. -60°C च्या तापमानात, 50 किमी/ताशी वाऱ्याच्या वेगात आणि 73% कमी दाबाच्या वातावरणातही यशस्वी चाचणी झाली आहे.

या यशामुळे केवळ हवाई दलालाच नव्हे, तर संपूर्ण भारतीय संरक्षण यंत्रणेला आत्मनिर्भर बनण्याची नवी दिशा मिळाली आहे. भारत आता उच्च उंचीवर चालणाऱ्या, दीर्घकाळ हवेत राहू शकणाऱ्या (HALE) ड्रोन क्षेत्रात स्पर्धक म्हणून पुढे येत आहे. केवळ कलाम लॅब्सच नव्हे, तर ideaForge, DRDO, HAL आणि इतर संस्थाही MALE, स्वार्म ड्रोन आणि HAPS यासारख्या नव्या तंत्रज्ञानावर काम करत आहेत.

या प्रयत्नांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारताला आता परदेशातून महागड्या ड्रोनच्या आयातीवर अवलंबून राहावं लागणार नाही. हे केवळ आर्थिक दृष्टिकोनातून नाही, तर सामरिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण अशा ड्रोनद्वारे सीमेवरील सतत देखरेख शक्य होणार असून, कोणत्याही शत्रूच्या हलचाली वेळीच हेरल्या जाऊ शकतात.








