आजचा स्मार्टफोन हा केवळ कॉल किंवा मेसेजसाठी वापरला जाणारा साधा उपकरण राहिलेला नाही. आरोग्यविषयक नोंदी, बँकिंग व्यवहार, वैयक्तिक फोटो-व्हिडिओ, लोकेशन हिस्टरी आणि सोशल मीडियावरील संवाद—असा प्रचंड संवेदनशील डेटा आपल्या फोनमध्ये साठवला जातो. त्यामुळेच कंपन्या आणि सायबर गुन्हेगार दोघांच्याही नजरा या डेटावर असतात. विविध अभ्यासांनुसार सुमारे ७० टक्के अॅप्स वापरकर्त्यांच्या संवेदनशील माहितीपर्यंत प्रवेश मिळवतात, तर जवळपास ६० टक्के अॅप्स कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशन यांसारख्या फीचर्ससाठी परवानगी मागतात. अशा परिस्थितीत तुमच्या गोपनीयतेचे रक्षण करणे ही केवळ निवड नसून गरज बनली आहे. खाली दिलेल्या सेटिंग्ज तपासून आणि बदलून तुम्ही तुमचा डेटा अधिक सुरक्षित ठेवू शकता.
सूचना अॅक्सेस तपासा आणि नियंत्रित करा
अनेक जण स्मार्टवॉच किंवा इतर डिव्हाइसवर फोनच्या सूचना पाहतात. अँड्रॉइडमध्ये मिरर नोटिफिकेशनचा पर्याय असल्यामुळे काही अॅप्स तुमच्या इतर डिव्हाइसवरही सूचना दाखवू शकतात. या सूचनांमध्ये बँकिंग अलर्ट, ओटीपी, वैयक्तिक संदेश, ईमेल किंवा सोशल मीडिया नोटिफिकेशन असतात. जर या सूचना चुकीच्या हातात गेल्या तर तुमची गोपनीय माहिती उघड होऊ शकते. त्यामुळे सेटिंग्जमध्ये जाऊन नोटिफिकेशन अॅक्सेसचा आढावा घ्या आणि दररोज वापरत नसलेल्या अॅप्ससाठी सूचना प्रवेश बंद करा. यामुळे संवेदनशील माहितीचा अनावश्यक प्रसार थांबेल.
जाहिरात आयडी हटवून ट्रॅकिंग कमी करा
प्रत्येक अँड्रॉइड डिव्हाइसला एक वेगळा जाहिरात आयडी दिला जातो. हा आयडी तुमच्या अॅप वापराच्या सवयींवर आधारित वैयक्तिकृत जाहिराती दाखवण्यासाठी वापरला जातो. सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही हा जाहिरात आयडी हटवू किंवा रीसेट करू शकता. यामुळे जाहिराती पूर्णपणे बंद होणार नाहीत, पण जाहिरातदारांना तुमचे सविस्तर प्रोफाइल तयार करणे कठीण जाईल. परिणामी, तुमच्या ऑनलाइन हालचालींवर होणारे ट्रॅकिंग कमी होईल.
वापर आणि निदान डेटा शेअरिंग बंद करा
अँड्रॉइडमध्ये वापर आणि निदान डेटा Google सोबत शेअर करण्याचा पर्याय असतो. या डेटाचा उपयोग सिस्टीमची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि बग्स दुरुस्त करण्यासाठी केला जातो. अनेक वेळा हा पर्याय डीफॉल्टनुसार सुरू असतो. जर तुम्हाला अतिरिक्त डेटा शेअर करायचा नसेल, तर सेटिंग्जमध्ये जाऊन हा पर्याय बंद करा. त्यामुळे तुमच्या वापराशी संबंधित माहिती बाहेर जाणे मर्यादित होईल.
अॅप परवानग्यांचे नियमित पुनरावलोकन करा
अॅप इन्स्टॉल करताना आपण बहुतेक वेळा परवानग्या न वाचताच “Allow” करतो. पण काही अॅप्स त्यांच्या गरजेपेक्षा जास्त परवानग्या मागतात. उदाहरणार्थ, साध्या टॉर्च अॅपला लोकेशन किंवा कॉन्टॅक्ट्सची परवानगी आवश्यक नसते. अशा अनावश्यक परवानग्या दिल्यास तुमचा डेटा तृतीय पक्षांकडे जाऊ शकतो. फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अॅप परवानग्या तपासा आणि केवळ आवश्यक तेवढ्याच परवानग्या ठेवा. नियमित अंतराने हा आढावा घेतल्यास संभाव्य धोके टाळता येतील.
डिजिटल सुरक्षिततेसाठी सजग राहणे आवश्यक
गोपनीयता ही एकदाच सेटिंग बदलून मिळणारी गोष्ट नाही; ती सतत जपावी लागते. अज्ञात अॅप्स डाउनलोड टाळणे, अधिकृत स्रोतांवरूनच अॅप्स घेणे, सिस्टीम अपडेट्स वेळेवर इन्स्टॉल करणे आणि मजबूत पासवर्ड वापरणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. काही मिनिटे काढून या सेटिंग्ज तपासल्यास तुमचा मौल्यवान डेटा अधिक सुरक्षित राहील आणि डिजिटल जगात तुम्ही अधिक निर्धास्तपणे वावरू शकाल.








