महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता लक्ष स्वीकृत नगरसेवक पदांकडे वळले आहे. या पदांसाठीची निवड 26 फेब्रुवारी रोजी विशेष सभेत होणार असल्याचे जाहीर झाल्याने इच्छुकांमध्ये हालचालींना वेग आला आहे. मनपा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी दिली जाणार की सामाजिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तींना प्राधान्य मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. तसेच स्वीकृत नगरसेवकांचा कार्यकाळ महापौर-उपमहापौरांप्रमाणे सव्वा वर्षांचा राहणार की पूर्ण पाच वर्षांचा असेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष सभांमध्ये होणार निवड प्रक्रिया
महापालिकेतील स्वीकृत सदस्य तसेच स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड दोन स्वतंत्र विशेष सभांमध्ये केली जाणार आहे. या दोन्ही समित्यांमध्ये प्रत्येकी 16 सदस्यांची नियुक्ती होणार असून 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता समिती सदस्यांची निवड होईल, तर दुपारी 12 वाजता स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी सभा पार पडणार आहे. संबंधित पक्षांचे गटनेते सदस्यांची नावे सुचवतील आणि त्यानुसार नियुक्त्या केल्या जातील.
पक्षनिहाय संख्याबळ आणि गणित
महापालिकेतील सत्ताधारी आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे 27 आणि भारतीय जनता पक्षाचे 25 नगरसेवक आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेचे 10 सदस्य आहेत. काँग्रेस आणि एमआयएमचे प्रत्येकी 2 सदस्य, बसपाचा 1 आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांचा 1 सदस्य असा उर्वरित संख्याबळ आहे.
एकूण सदस्यसंख्या आणि विषय समितीच्या सदस्यसंख्येनुसार 4.25 चे मूल्यांकन निश्चित करण्यात आले आहे. या आधारावर स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, भारतीय जनता पक्षाचे 6, शिवसेनेचे 2 तसेच काँग्रेस व एमआयएमचा प्रत्येकी 1 सदस्य नियुक्त होणार आहे. महिला व बालकल्याण समितीतही याच प्रमाणात सदस्यांची विभागणी होणार आहे.
लॉबिंगला वेग; राजकीय हालचाली वाढल्या
स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीतील सदस्यत्वासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी-भाजप गटातील इच्छुकांनी पक्ष नेत्यांकडे संपर्क वाढविला आहे. समिती सदस्यत्व हे महत्त्वाचे मानले जात असल्याने पक्षांतर्गत चर्चांना वेग आला आहे. स्वीकृत नगरसेवक पदांबाबतही विविध दावे-प्रतिदावे सुरू असून पक्षश्रेष्ठींकडे शिफारशी सादर केल्या जात आहेत.
सभापती निवडीसाठी पुढील टप्पा
समिती सदस्यांची निवड पूर्ण झाल्यानंतर स्थायी समिती सभापती तसेच महिला व बालकल्याण समितीचे सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीसाठी निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. विभागीय आयुक्तांकडून सभेची तारीख जाहीर झाल्यानंतर अधिकृत निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध होईल आणि त्यानुसार निवड प्रक्रिया पार पडणार आहे.














