शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी राजकीय वर्तुळ ढवळून निघाले असतानाच ठाकरे गटाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. या चर्चेनंतर शिर्डीतील ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक आक्रमक झाले असून, वाकचौरे यांच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक
शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर जिल्हाप्रमुख सचिन कोते, उपजिल्हाध्यक्ष नाना बावके, तालुकाप्रमुख संजय शिंदे, सोमनाथ गोरे, तालुका संघटक संदीप दिघे, नानक सावंत्रे, मनोज जाधव, आकाश मुंडे, ऋषिकेश चित्ते यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. खासदार वाकचौरे यांनी पक्षनिष्ठेबाबत वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
शिवसैनिकांचा वाकचौरे यांच्यावर रोष
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार वाकचौरे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. साईबाबांची शपथ घेऊनही त्यांनी शिवसैनिकांचा विश्वासघात केल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला. शिवसैनिक जनतेच्या सेवेसाठी खांद्याला खांदा लावून काम करतात; मात्र पक्षाशी गद्दारी झाल्यास त्याविरोधात ठाम भूमिका घेतली जाते, असा इशाराही या बैठकीतून देण्यात आला. वाकचौरे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना शिर्डी मतदारसंघात विरोधाला सामोरे जावे लागेल, अशी आक्रमक भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मांडली.
शिंदे गटाशी संपर्काच्या चर्चांना उधाण
गेल्या काही दिवसांपासून खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना वेग आला होता. या चर्चांवर वाकचौरे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. त्यांनी मौन बाळगल्याने राजकीय तर्कवितर्कांना आणखी खतपाणी मिळाले. बुधवारी सायंकाळी वाकचौरे अचानक विमानाने दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिर्डी मतदारसंघातील राजकीय हालचाली अधिकच वेगवान झाल्या.
ठाकरे गटातील सहा खासदारांच्या स्वतंत्र गटाची चर्चा
बुधवारी दिवसभरात ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट तयार केल्याची मोठी राजकीय घडामोड समोर आली. या पार्श्वभूमीवर या खासदारांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश निश्चित मानला जात असल्याची चर्चा सुरू झाली. त्यात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव चर्चेत आल्याने स्थानिक पातळीवर ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
वाकचौरे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त
राजकीय वातावरण तापू लागल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डीतील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
विकासासाठी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय
या घडामोडींवर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देवमाणूस असून त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय प्रामाणिक हेतूने घेतल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. जनतेने विश्वासाने निवडून दिल्यानंतर त्यांच्या अडचणी कमी करता येत नसतील, तर लोकप्रतिनिधी म्हणून राहण्यात अर्थ उरत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उत्तरनगर जिल्ह्यात सर्वांना सोबत घेऊन हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचे वाकचौरे यांनी स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांतून दिशाभूल करणाऱ्या आणि आर्थिक विषयक चुकीच्या बदनामीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही सहकारी रोष व्यक्त करत असले, तरी लोकसभा मतदारसंघातील जनमत आणि शिवसैनिक आपल्या निर्णयाशी सहमत असल्याचा दावा वाकचौरे यांनी केला.
लवकरच शिर्डीत ताकद सिद्ध करण्याचा दावा
खासदार वाकचौरे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी आणि निवडून दिलेल्या जनतेप्रती स्वच्छ हेतूने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. सामान्य जनता हा निर्णय स्वीकारत असून मतदार बांधव आणि शिवसैनिक याचे स्वागत करत असल्याचा दावा त्यांनी केला. शिर्डीतील आपली ताकद लवकरच सिद्ध करू, असेही वाकचौरे यांनी म्हटले आहे.
पत्नी सरस्वती वाकचौरे यांची प्रतिक्रिया
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी सरस्वती वाकचौरे यांनीही या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. वाकचौरे मंगळवारी सायंकाळी दिल्लीला गेले असून बुधवारी ते हरिद्वार येथील एका धार्मिक कार्यक्रमाला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी रात्री त्यांच्याशी बोलणे झाले होते; मात्र बुधवारी संपर्क झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांबाबत आपल्याला सविस्तर माहिती नसून आपणही ही माहिती टीव्हीवरूनच पाहत असल्याचे सरस्वती वाकचौरे यांनी सांगितले.














