मुलाच्या डोळ्यासमोर आईचा जीव गेला; अहिल्यानगर जिल्ह्यात भीषण अपघात

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: September 9, 2025

गणेश विसर्जन करून मुंबईकडे निघालेल्या भाविकांच्या दोन पिकअप टेम्पोला लोखंडी सामान घेऊन जाणाऱ्या ट्रेलरची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात पारनेर तालुक्यातील शालूबाई विष्णू गुंड (६७, रा. कामोठे, पनवेल; मूळ रा. वडगाव दर्या, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा स्वप्निल गुंड यासह पाच जण गंभीर जखमी झाले.

ही दुर्घटना रविवारी (७ सप्टेंबर) मध्यरात्री साडेबारा वाजता तळेगाव–चाकण महामार्गावरील माळवाडी येथे घडली. अपघातानंतर ट्रेलर चालक वाहनासह पसार झाला.

लोखंडी रॉडमुळे टेम्पो फरपटला

ट्रेलरवरील लोखंडी रॉड बाहेर आलेले होते. धडकेनंतर हेच लोखंडी सामान पिकअप टेम्पोला फरपटत नेत होते. अपघातानंतर रस्त्यावर लोखंडी सामान अस्ताव्यस्त पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

मुलासमोर आईचा मृत्यू

या अपघातात शालूबाईंचा एकुलता एक मुलगा व पिकअप चालक स्वप्निल विष्णू गुंड (३४) गंभीर जखमी झाला आहे. आईसमोरच झालेला हा अपघात पाहून तो कोसळला. त्याच्यावर तळेगाव स्टेशन येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींची नावे

स्वप्निल विष्णू गुंड (३४, गंभीर)

संदेश हरिश्चंद्र ढेरे (१९)

रंगनाथ गंगाराम आहेर (३६)

शीतल रंगनाथ आहेर (३४)

शिवांश रंगनाथ आहेर (५, सर्व रा. कामोठे, पनवेल; मूळ रा. आणे, ता. जुन्नर, जि. पुणे)

जखमींवर तळेगाव स्टेशन येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा