अहिल्यानगर- नगर जिल्ह्यात मागील चार दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. आतापर्यंत ९७ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ९५ हजार ८०२ हेक्टरवर खरीप पेरणी झाली.
यामध्ये सर्वाधिक १ लाख ८३ हजार ३०४ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली. आतापर्यंत जिल्ह्यात १९८.८ मिमी पावसाची नोंद झाली.
मागील पंधरा ते वीस दिवस पावसाने उसंत दिल्याने खरीप पिके वाया जातात की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी ७ लाख १६ हजार २०८ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये आतापर्यंत ६ लाख ९५ हजार ८०२ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात १०१८५ हेक्टरवर भात पिकाची लावणी झाली. ६० हजार ६५० हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली. मका पिकाची १ लाख ३२६१ हेक्टरवर पेरणी झाली. तुरीची ७० हजार १८२ हेक्टरवर पेरणी झाली.
मुगाची ४८ हजार ७२० हेक्टरवर पेरणी झाली. उडीद ७० हजार ४६४ हेक्टर पेरणी झाली. भुईमूग ४८५० हेक्टर, तर सूर्यफूलाची ४३ हेक्टरवर पेरणी झाली. सोयाबीनची सर्वाधिक १ लाख ७८ हजार १६२ हेक्टरवर पेरणी झाली. कपाशीची १ लाख ४३ हजार ७६ हेक्टरवर लागवड झाली. कारळ्याची १९२ हेक्टरवर, तर तिळाची ३० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात ६० मिमी कमी पाऊस
अहिल्यानगर जिल्ह्यात १७ ऑगस्टअखेर १९८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जून आणि जुलै महिन्यात फक्त १६ दिवस पाऊस झाला. जूनमध्ये ८०.१ मिमी, तर जुलैमध्ये ६०.४ मिमी पाऊस झाला. ऑगस्टमध्ये आतापर्यंत ५८.३ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी २०२४ मध्ये १७ ऑगस्टअखेर ३६०.१ मिमी पाऊस झाला होता. जिल्ह्याचा आजअखेरचा सरासरी पाऊस २५८ मिमी आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत अद्याप ६० मिमी कमी पाऊस झाला, तर गतवर्षीच्या तुलनेत १६१.३ मिमी पावसाची तूट झाली. असे असले तरी पाऊस सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे.
जामखेडमध्ये सर्वाधिक, तर श्रीरामपुरात सर्वात कमी पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत १९८.८ मिमी पावसाची नोंद झाली. चार दिवसांपासून पाऊस सक्रीय झाल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांवरील संकट टळले. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २६५ मिमी पाऊस जामखेड तालुक्यात झाला, तर सर्वात कमी १२३ मिमी पाऊस श्रीरामपूर तालुक्यात झाला. नगर तालुक्यात आतापर्यंत २०६.५ मिमी, पारनेर १७५.८ मिमी, श्रीगोंदा १९६.५ मिमी, कर्जत २४१.९ मिमी, शेवगाव २२८.८ मिमी, पाथर्डी २२४.५ मिमी, नेवासा १७५ मिमी, राहुरी १६३.८ मिमी, संगमनेर १६०.२ मिमी, अकोला २६३ मिमी, कोपरगाव १५६.१ मिमी, तर राहाता तालुक्यात १७३.७ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
पिकांतील आंतरमशागतीच्या कामांना आला वेग
जिल्ह्यात खरीप हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पावसामुळे पिके तरारून आली आहेत. सध्या पिकांच्या आंतरमशागतीचे काम सुरू आहे. पावसात खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती. परंतु या पावसामुळे पिकांना लाभ झाला आहे. सध्या शेतकरी खरीप पिकांना खते टाकण्याच्या कामात व्यस्त आहेत. दरम्यान, सध्या मूग तोडणीच्या आवस्थेत आहे. परंतु सततच्या पावसाने मूग पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. असे असले तरी खरीप पिकांसाठी पाऊस आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची अपेक्षा आहे.








