गुलछडीला विक्रमी भाव, ५०० ते १२०० रुपयांपर्यंत किलोला दर

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: September 1, 2025

अहिल्यानगर : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूल मार्केटमध्ये रविवारी फुलांच्या बाजारात गुलछडीला विक्रमी भाव मिळाला, रविवारी झालेल्या लिलावात गुलछडीच्या फुलांना प्रतिकिलोला ५०० ते १२०० रुपये, तर प्रतिक्विंटल ५० हजार ते १ लाख २० हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. मागील पाच ते सात वर्षांतील हा विक्रमी भाव असून गुलछडी उत्पादक शेतकऱ्यांना गणपती पावला आहे.


अहिल्यानगर बाजार समितीत रविवारी गुलछडीच्या फुलांची ९.९० क्विंटल आवक झाली होती. यावेळी लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत गुलछडीला प्रतिक्विंटल ५० हजार रुपये ते १ लाख २० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. दरम्यान, गौरी आगमनानिमित्त गुलछडीच्या बाजारभावात वाढ झाली असल्याचे आडत व्यापाऱ्यांचे म्हणने आहे.

अहिल्यानगर बाजार समितीत रविवारी गुलाब फुलांच्या १८३९ जुड्यांची आवक झाली होती. यावेळी गुलाब फुलांच्या जुडीला ८० ते १५० रुपयांपर्यंत भाव मिळाला. झेंडुच्या फुलांची २८ क्विंटल आवक झाली होती. यावेळी लिलाव पद्धतीने झालेल्या खरेदीत झेंडूच्या फुलांना प्रतिक्विंटल ५००० ते ८ हजार रुपये भाव मिळाला. शेवंतीच्या फुलांची १७क्विंटल आवक झाली होती.

शेवंतीला १३ हजार ते १८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. आस्टरच्या फुलांची ९ क्विंटल आवक झाली होती. यावेळी आस्टरला प्रतिक्विंटल १५ हजार ते १८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. जरबेराच्या फुलांची सव्वाक्विंटल आवक झाली होती. जरबरेला
प्रतिकिलो ५ हजार ते ८ हजार रुपये भाव मिळाला. यावेळी डच गुलाबाच्या २०३ जुड्यांची आवक झाली होती. डच गुलाबाच्या जुडीला १०० ते २०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

गौरीपूजेसाठी गुलछडीला मिळाला सर्वाधिक भाव

सोमवारी असलेल्या गौरी पूजेच्या पार्श्वभूमीवर गुलछडीच्या भावात मोठी वाढ झाली. गुलछडीच्या फुलांना प्रतिकिलो ६०० ते १२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवंतीला प्रतिकिलो १०० ते १८० रुपये भाव मिळाला, असे अहिल्यानगर बाजार समितीतील फुलांचे आडत व्यापारी तथा शेतकरी मच्छिंद्र सीताराम कातोरे यांनी सांगितले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा