अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाची विश्रांती? भंडारदरा- निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: June 21, 2025

Ahilyanagar Rain Alert:- अकोले तालुक्यात मागील तीन दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण भागात जलस्त्रोत भरून निघाले आहेत. विशेषतः भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी भर पडली आहे. आज शुक्रवारी पावसाचा जोर ओसरल्याने काहीसा दिलासा मिळाला असला, तरी धरणात येणाऱ्या नव्या पाण्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईसारख्या समस्यांवर काही प्रमाणात मात करता येईल, असा आशावाद निर्माण झाला आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याने धरणात तब्बल ४ टीएमसी इतका साठा वाढला आहे. कळसुबाई आणि रतनगड परिसरात झालेल्या पावसामुळे या धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. गेल्या चोवीस तासांतच या धरणात ७६० दलघफूट (दशलक्ष घनफूट) नवीन पाण्याची भर पडली आहे. परिणामी, धरणाचा सध्याचा एकूण साठा ३,९९४ दलघफूट इतका झाला आहे.

वाकी तलाव भरल्यामुळे कृष्णवती नदी जी प्रवरा नदीची उपनदी आहे ती पुन्हा वाहू लागली असून याचा थेट फायदा निळवंडे धरणाला झाला आहे. निळवंडे धरणात देखील नव्या पाण्याची आवक सुरू झाली असून, गेल्या २४ तासांत या धरणात २३८ दलघफूट पाणी साचलं आहे. त्यामुळे निळवंडे धरणाचा सध्याचा पाणीसाठा २,८६३ दलघफूट झाला आहे.

त्याचप्रमाणे, आढळा नदीचा देखील प्रवाह मिळाल्यामुळे आढळा धरणात ९६ दलघफूट नवीन पाणी जमा झालं आहे. सद्यस्थितीत हे धरण ६३.६८ टक्के भरले असून, आगामी काळात पाऊस पुन्हा सुरू झाल्यास हे धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरू शकेल.

दरम्यान, पावसाचा जोर ओसरल्यामुळे मुळा नदीच्या पाण्याची पातळीही काहीशी खाली आली आहे. कोतुळ परिसरात सकाळी मुळा नदीचा विसर्ग ६,९५१ क्युसेक इतका नोंदवण्यात आला. मुळा धरणाचा एकूण पाणीसाठा ९,४९४ दलघफूट इतका झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठीही पाण्याचा मुबलक साठा मिळण्याची शक्यता आहे.

पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, भंडारदरा परिसरात १४० मिमी, घाटघर १४३ मिमी, पांजरे १०८ मिमी, रतनवाडी १५७ मिमी, वाकी ११६ मिमी, निळवंडे ५३ मिमी, आढळा १३ मिमी, अकोले ४६ मिमी तर कोतुळ परिसरात ४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे अकोले तालुक्यातील सर्व नदी, ओढे, तलाव, बंधारे भरून वाहू लागले असून ग्रामीण भागात शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेला ओलावा उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, जरी आता पावसाचा जोर थोडा ओसरलेला असला, तरी पुढील आठवड्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच, डोंगराळ आणि नदीकिनाऱ्याच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी भूस्खलन, पूर यांसारख्या संभाव्य आपत्तींपासून संरक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा