डॉ. विठ्ठलराव विखे पाटील इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थी जागृती शिबीर संपन्न…!

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 18, 2025

अहिल्या नगर : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटलच्या अवयव प्रत्यारोपण विभागाच्या वतीने, मा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली अंगदान जागृती अभियान 2025/2026 अंतर्गत विशेष विद्यार्थी जागृती शिबिराचे आयोजन डॉ. विखे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, अहिल्यानगर येथे उत्साहात संपन्न झाले.

या शिबिरात अवयव प्रत्यारोपण विभागाचे समन्वयक श्री. राज गिर्हे यांनी अंगदानाचे महत्त्व, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची प्रक्रिया, दान नोंदणीची पद्धत, तसेच भारतीय समाजाची सकारात्मक भूमिका या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

श्री. गिर्हे यांनी सांगितले की, “अंगदान म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला नवा श्वास, नवा जीवनप्रवास देण्याचे दान आहे. सजग भारतीय नागरिक म्हणून विद्यार्थीवर्गाने या अभियानाचा प्रचार-प्रसार करून समाजात अंगदानाबाबत सकारात्मक दृष्टीकोन रुजवावा.”

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटलच्या अवयव प्रत्यारोपण विभागामार्फत आजपर्यंत अनेक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून अनेक रुग्ण आनंदी व निरोगी जीवन जगत आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अनेक प्रश्न विचारले. नवीन माहिती मिळवण्याची व सामाजिक बदलासाठी हातभार लावण्याची तत्परता नव्या पिढीत दिसून आली.

या उपक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या सौ. नम्रता ओहरी मॅडम, शिक्षकवृंद यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच विद्यार्थ्यांसोबत पालकवर्ग व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“अंगदान – एक पवित्र कार्य, नवा जीवनदायिनी प्रवास” या भावनेने विद्यार्थी वर्गामध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव रुजविण्यास हे शिबिर मोलाचे ठरले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा