भारतीय सैन्यदलाचे शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा हे नेहमीच जगासाठी प्रेरणादायी- कमांडिंग ऑफिसर कर्नल अभिषेक पटवर्धन

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 20, 2025

अहिल्यानगर- भारतीय सैन्यदल हे जगातील सर्वात शिस्तबद्ध आणि बलाढ्य दल मानले जाते. त्यांचे शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा हे नेहमीच जगासाठी प्रेरणादायी ठरले आहे. राष्ट्ररक्षणाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेली ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम हे त्याचेच जाज्वल्य उदाहरण आहे, असे प्रतिपादन कमांडिंग ऑफिसर कर्नल अभिषेक पटवर्धन यांनी केले.

अहिल्यानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर विशेष व्याख्यान व सैन्य अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. अभिषेक पटवर्धन म्हणाले, देशाच्या सीमांवर सुरक्षा धोक्यांना प्रतिबंध घालणे आणि नागरिकांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. प्रतिकूल हवामान, कठीण भौगोलिक परिस्थिती आणि शत्रूच्या डावपेचांना तोंड देत भारतीय जवानांनी दाखवलेले धैर्य वाखाणण्याजोगे आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सेना व हवाईदलाचा अचूक समन्वय, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि काटेकोर रणनितीमुळे मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. सैनिकांच्या शिस्तीने, संघभावनेने आणि राष्ट्रभक्तीच्या बळावर खरी शौर्यगाथा लिहिली गेली. मुख्य अतिथी ब्रिगेडियर पी. सुनील कुमार (सेना मेडल अँड बार), कमांडंट, मेकॅनाईज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल यांनी विद्यार्थ्यांना देशसेवा, शिस्त व आधुनिक सैनिकी तंत्रज्ञानाबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कर्नल अभिषेक पटवर्धन यांच्या पत्नी राधिका पटवर्धन याही उपस्थित होत्या.

शिक्षण अधिकारी ले. कर्नल मुकेश उपाध्याय, तांत्रिक अधिकारी मेजर मयंक भारद्वाज, नाईक सुबेदार अशीष कुमार तसेच एम.आय.सी अॅण्ड एस.चे जवान या व्याख्यानात सहभागी झाले. मान्यवरांमध्ये सचिव व कार्यवाहक महासंचालक प्रशासन डॉ. पी. एम. गायकवाड, मेडिकल डायरेक्टर डॉ. अभिजित दिवटे, टेकनिकल डायरेक्टर डॉ. सुनील कल्हापुरे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. आर. के. पडळकर, डीन डॉ. सुनील नाथा म्हस्के वैद्यकीय अधीक्षकडॉ. सतीश देशपांडे, प्राचार्य नम्रता ओहरी यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा