केडगावमध्ये चोरट्यांनी सोन्याचे दुकान फोडले, ८८ हजारांचा ऐवज नेला चोरून

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 28, 2025

अहिल्यानगर- केडगाव उपनगरातील शाहुनगर बस स्टॉपजवळील बालाजी ज्वेलर्स या सराफी दुकानाचे शटरचे लॉक तोडून चोरांनी सोन्या-चांदीचे दागिने व सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा सुमारे ८८ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २५ ऑगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मुकेश मधुकर दहिवाळ (वय ४३, रा. कौशल्यानगरी, माधवनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, केडगाव उपनगरातील शाहुनगर बस स्टॉप जवळ बालाजी ज्वेलर्स नावाचे आमचे सराफी दुकान आहे. २५ ऑगस्ट रोजी रात्री ८. ३० वाजता दुकानाचे शटरला लॉक करून घरी गेलो होतो.

२६ ऑगस्ट रोजी सकाळी आम्हाला दुकानात चोरी झाल्याचे समजले. तत्काळ त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दागिने व सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा सुमारे ८८ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कोतवाली पोलीस गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा