अहिल्यानगर- सोन्याचे दागिने पहिल्यापेक्षा जास्त उजळून देतो, असे म्हणून दोन अनोळखी व्यक्तींनी एका ७८ वर्षीय वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करून सुमारे ५ तोळ्याचे दागिने लांबविले. ही घटना २६ ऑगस्ट रोजी दुपारी वीर सावरकर मार्ग, वसंत टेकडी, सावेडी येथे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सुमन माणिक बैरागी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, २६ ऑगस्ट रोजी दुपारी त्या अंगणात कपडे वाळत घालत असताना दोन अनोळखी व्यक्ती घराच्या कंपाउंडमध्ये आले. त्यातील एकाने आम्ही भांड्याची पावडर विकायला आलो आहोत. त्याने भांडी चकाचक होतात असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्याने प्रथम घरातील तांब्याचे भांडे स्वच्छ करून दाखवले.
त्यानंतर फिर्यादींच्या हातातील सोन्याच्या बांगडीवर पावडर घासून ती अधिक चमकदार झाली असल्याचे दाखवले. त्यावर विश्वास ठेऊन फिर्यादीने आपले हातातील, गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने एका स्टीलच्या डब्यात ठेऊन त्या व्यक्तीकडे दिले. व्यक्तीने त्यावर पावडर टाकून झाकण लावले व पाच मिनिटांनंतर उघडा, दागिने अधिक चमकतील, असे सांगून डबा परत देत दोघेही पसार झाले.
तथापि, काही वेळाने डबा उघडून पाहिल्यावर त्यामध्ये कोणतेही दागिने आढळले नाहीत. त्यानंतर वृध्द दाम्पत्याने घरभर शोध घेतला पण दागिने मिळाले नाहीत. त्यावेळी त्या अनोळखी व्यक्तीने फसविल्याचे लक्षात आले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये तीन तोळ्याच्या सोन्याच्या दोन बांगड्या, चार ग्रॅमचे सोन्याचे कानातील दोन टॉप्स व दीड तोळ्याची सोन्याची चैन यांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत आहेत.








