Ahilyanagar धक्कादायक! शिक्षक नोकरीच्या नावाखाली 30 लाखांची फसवणूक

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: March 25, 2026

पाथर्डी तालुक्यात नोकरीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक भरतीच्या आमिषाने एका दांपत्याकडून तब्बल ३० लाख रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद असून, बनावट नियुक्तीपत्रे आणि नोटरीद्वारे करारनामे तयार करून विश्वासार्हतेचे वातावरण निर्माण करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.

ओळखीच्या माध्यमातून संपर्क, नोकरीचे आमिष

रुपेशकुमार राम बागडे (वय ३९) आणि प्रियांका महादेव आदापुरे (वय ३५, रा. शिक्षक कॉलनी, माळीबाभूळगाव, ता. पाथर्डी) या दांपत्याने याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शिक्षक पदासाठी प्रयत्न करत असताना त्यांचा परिचय सुभाष माणिक खेडकर (रा. मालेवाडी, ता. पाथर्डी) याच्याशी झाला. खेडकर याने स्वतः छत्रपती संभाजीनगर येथील एका अनुदानित शिक्षण संस्थेत कार्यरत असल्याचे सांगत डी.एड.च्या दोन रिक्त जागांची माहिती दिली.

यानंतर खेडकर याने संस्थाचालक लिंबराज रामचंद्र जाधव (रा. हर्सुल सावंगी, छत्रपती संभाजीनगर) यांच्याशी भेट घडवून आणली. या भेटीत दोघांनाही शिक्षक पदावर नियुक्ती देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी १५ लाख रुपये, असे एकूण ३० लाख रुपये मागण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

हप्त्यांमध्ये रक्कम अदा, बनावट कागदपत्रांचा वापर

नोकरीच्या आशेने दांपत्याने नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आरटीजीएस, फोनपे आणि रोख स्वरूपात एकूण ३० लाख रुपये दिले. विश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाच्या नावाने बनावट मान्यता आदेश आणि नियुक्तीपत्र देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच नोटरीद्वारे करारनामा करून संपूर्ण व्यवहार अधिकृत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला.

या करारनाम्यात संबंधितांना सहशिक्षक म्हणून नियुक्त केल्याचे नमूद असून, शाळेतील पदांमध्ये बदल झाल्यास त्याची जबाबदारी संस्थेवर राहील, असेही दाखवण्यात आले आहे. तसेच कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास मोठी रक्कम परत करण्याची तरतूदही करारनाम्यात नमूद करण्यात आली होती.

नोकरी न मिळाल्याने फसवणूक उघड

प्रत्यक्षात कोणतीही नियुक्ती न झाल्याने दांपत्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

इतरांनाही गंडा घालण्याची शक्यता

या प्रकारामागे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशाच पद्धतीने इतर अनेक उमेदवारांचीही फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त होत असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी जोर धरत आहे. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पीडितांकडून करण्यात आली आहे.

नोटरी करारनाम्याने विश्वासार्हतेचा आव आणला

या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे नोटरीद्वारे अधिकृत करारनामा करून उमेदवारांचा विश्वास संपादन करण्यात आला. १३ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे तयार करण्यात आलेल्या करारनाम्यात चेतनानगर परिसरातील शाळेत शिक्षक नियुक्ती केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रक्रियेत अधिकृततेचा आव आणून उमेदवारांना विश्वासात घेण्यात आले.

माजी सैनिकाच्या बचतीवर डल्ला

फसवणूक झालेल्या दांपत्यातील रुपेशकुमार बागडे यांचे वडील माजी सैनिक असून, त्यांच्या आयुष्यभराच्या बचतीतील रक्कम या व्यवहारात खर्च झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक धक्का बसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा