संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे झालेल्या कीर्तनावेळी निर्माण झालेल्या गोंधळानंतर कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याच्या चर्चेला गेल्या काही दिवसांत मोठे उधाण आले होते.
या घटनेमुळे केवळ स्थानिक पातळीवर नव्हे तर राज्याच्या राजकीय वर्तुळात तसेच वारकरी संप्रदायामध्येही खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीत या चर्चेत तथ्य नसल्याचे उघड झाले आहे.
घुलेवाडी येथे कीर्तनादरम्यान झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भंडारे यांच्या वाहनाची तोडफोड झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले होते.
यावर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सभेतच सीसीटीव्ही फुटेज सादर करून हे दावे खोटे असल्याचे सांगितले. त्या फुटेजमध्ये गाडीला कुठलेही नुकसान झालेले दिसत नव्हते.
यानंतर पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. शुक्रवार, २२ ऑगस्ट २०२५ रोजी संगमनेर शहर पोलिसांनी हिवरगाव पावसा आणि चाळकवाडी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासले.
दरम्यान तपासात एमएच १४ जीएस २८५६ क्रमांकाची गाडी १०, ११ आणि १७ ऑगस्ट रोजी जशीच्या तशीच असल्याचे निष्पन्न झाले. वाहनावर तोडफोड झाल्याचा कुठलाही पुरावा पोलिसांना मिळालेला नाही.
या निष्कर्षामुळे भंडारे यांच्या गाडीवर तोडफोड झाल्याची चर्चा पूर्णपणे निराधार ठरली आहे. या संपूर्ण घटनेमागे राजकीय हेतू होता का, यावर आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे.








